भुसावळात रीपाइंचा वर्धापनदिन धूमधडाक्यात होणार!
Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । रीपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त पुढील महिन्याच्या 3 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महामेळावा होत असून याप्रसंगी सिने गायक राजू बागूल व सिने गायिका सुहासिनी शिंदे यांचा भीम गीतांचा जंगी सामना होणार असल्याची माहिती रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी शहरात रविवारी दुपारी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, पप्पू सुरडकर, सुनील ढिवरे, शरद सोनवणे, प्रकाश सोनवणे, बाळा सोनवणे आदी उपस्थित होते.
रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, या मेळाव्यासाठी राज्यभरातून तब्बल 15 हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतील शिवाय आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले या कार्यक्रमास हजेरी लावतील तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींसह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील.
जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी पुढे बोलताना म्हणाले की, आरपीआय हा ठरावीक समाजाचा पक्ष नसून यात सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे हा मुख्य उद्देश आहे. भुसावळात होणार्या मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले जाईल तसेच आरपीआय व भाजपाची युती असल्याने जिल्हा परीषद, नगरपालिका निवडणुकीत आरपीआयला जागा देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. यांनी दिली. आरपीआय हा सर्व समावेशक पक्ष असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात अनेक योजना रखडल्या आहेत. बेघरांना, अपंगांना न्याय नाही. या मेळाव्याच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यात येणार आहेत. मुख्य समस्यांचे पत्र तयार करून देण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश मकासरे व माझ्याकडे सोपविले आहे. त्या माध्यमातून आम्ही लोकांच्या अडीअडचणी सोडविणार आहोत, असेही राजू सूर्यवंशी यांनी सांगितले.