Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । गावातील सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडुन दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतुद करण्यात येते. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे काही भागांत सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आजतागत सांडपाण्यासाठी गटारीच बांधल्या गेल्या नसल्याने घाणरेडं पाणी सदर रहीवाशांच्या दाराशी पोहचुन तुंबत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित रहीवाशी या समस्येमुळे कंटाळले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याची शोकांतिका आहे.
ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावातील अनेक भागातील सांडपाण्याचा विल्हेवाट योग्यरीत्या लावलेला नाही. शासनाकडुन गत सात-आठ वर्षापासुन सांडपाण्याच्या बंदिस्त नाल्या बांधकामसाठी भरघोस निधी मिळुनसुद्धा ग्रामस्तरावर व्यवस्थितपणे नियोजन करुन कामे झाली नसल्याचे वास्तव्य आहे. येथील बसस्थानक पासुन पावसाच्या पाण्यासह रस्त्याच्या उर्ध्व भागातील दुतर्फा रहीवाशांचे सांडपाणी थेट रस्त्यावरुनच वाहत असुन सखल भागातील रहीवाशांच्या दारात तुंबत आहे. यामुळे मोठी दुर्गंधी येत असुन डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असुन रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे.
याबाबत येथील ग्रामस्थ शिवाजी पाटील ,समाधान पाटील, अंजनाबाई पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी लेखी तसेच वारंवार तक्रारी देऊनसुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी ‘जळगाव लाईव्ह न्युज’ शी संपर्क साधला. याबाबत जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनातील ग्रामसेवक व सरपंच गावात नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.