Dharangaon News । जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या, हाणामारी, खूनचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी चक्क वाईन शॉप फोडून तब्बल ७ लाख ४९ हजार ७७० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पाळधी येथील महामार्गालगत असलेले एस.पी.वाईन शॉप फोडत चोरट्यांनी रोकडसह महागड्या दारूच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. धरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे महामार्गालगत राजकुमार शितलदास मोटवानी यांच्या मालकीचे एस.पी.वाईन शॉप आहे. शुक्रवारी रात्री १०.१५ च्या सुमारास वाईन शॉप व्यवस्थापक भूषण अभिमान जगताप वय.२७ रा.पाळधी यांच्यासह इतरांनी दुकान बंद केले. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूला व्हेंटिलेशनसाठी लावण्यात आलेला पंखा वाकवून दुकानात प्रवेश केला.
दुकानातील लाकडी गल्ल्यात ठेवलेले ४ लाख १८ हजार रुपये रोख रक्कम आणि विविध ब्रँडची महागडी दारू असा एकूण ७ लाख ४९ हजार ७७० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास दुकानावर कामगार आले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास तपास सपोनि गणेश बुवाकरीत आहेत. चोरट्यांच्या नजरेतून घरे, मंदिरांसह आता मद्य दुकाने देखील सुटली नसून काही दिवसापूर्वी देखील एका बारवर डल्ला मारण्यात आला होता.