
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीवेळी आमदार डॉ सतीश पाटील व एकनाथराव खडसे यांच्यात चांगलीच जुलगबंदी पाहायला मिळाली.
प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डाॅ. सतीश पाटील यांनी ‘जिल्ह्यात पक्षाचे आठ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र, आमदार एकनाथ खडसेंनी ठरवले तर भुसावळच्या जागेसह ही संख्या नऊपर्यंत जाऊ शकते’ असे विधान केले. त्यावर ‘अगाेदर जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून दाखवा. त्यानंतर किती आमदार येतील ते ठरेल’ असे प्रतिउत्तर खडसेंनी दिले. त्यामुळे ही बैठक चर्चेची ठरली.
शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. आता राज्यातील परिस्थिती बदलली आहे. सत्तांतरानंतर जनतेत रोष आहे. हे वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. या पाच मतदारसंघांसह किमान सात आमदार जिल्ह्यातून निवडून आणण्याचे मिशन राष्ट्रवादीतर्फे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पाच मतदारसंघात ‘पन्नास खोके, एकदम ओके’ लिहिलेले टी-शर्ट वाटप करण्यात येतील असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ वाक्य लिहिलेले २० हजार टी-शर्ट शिंदे गटातील आमदारांच्या जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा या पाच मतदारसंघांत वाटण्यासाठी पाठवा, अशी मागणी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केली होती.

प्रदेशाध्यक्षांनी त्याला दुजोरा दिला. जिल्ह्यात किमान सात आमदार निवडून येऊ शकतात. आमदार एकनाथ खडसे यांनी ठरवले तर भुसावळातही राष्ट्रवादी येईल. त्यावर ‘आमदार सावकारे भाजपमध्ये जमा झालेले आहेत’ असे खडसे म्हणाले. पक्षात नवीन असल्याने डॉ. सतीश पाटील सांगतील तसे काम करू, असे खडसे म्हणाले. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी आता माजी मंत्री गुलाबराव देवकर हे मार्गदर्शन करतील, असे सांगितले.







