महाराष्ट्रराजकारण

शिंदेसाहेब,चोरांना शासनात जागा नकोच

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच २० ऑगस्ट ला सार्वजनिक उपोषण करीत आहोत.का ? गुलाबराव पाटील आमच्या शेजारी किंवा बांधावरचा किंवा धंद्यातील विरोधक नाहीत.ते जनतेचे आणि देशाचे शत्रू आहेत.फक्त गुलाबराव पाटील नव्हे ,अशा अनेक राजकीय , शासकीय चोरांच्या विरोधात आम्ही लढा दिला आहे.आता लढा गुलाबराव पाटील विरोधात.खूप मोठे पाप केले आहे,या माणसाने.तरीही मुख्यमंत्री शिंदेंनी या माणसाला आमच्या डोक्यावर मंत्री बनवले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काय म्हणावे? आम्ही त्यांच्या घरी जाऊन सांगून आलो आहोत.कि ,या माणसाने कोरोना काळात डीपीडीसी निधीचा गडबड घोटाळा केला आहे.ज्या कामासाठी, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यासाठी निधी दिला होता,ते न घेता भलतेच भंगार घेऊन ठेवले.आणि हे पाप उघडकीस आणले तेंव्हा ते भंगार पळवले,लपवले सुद्धा.चोराला चोरीची सवय असली तर आम्ही अडवत नाहीत.ते काम पोलिस व कोर्टाचे आहे.पण या गुलाबराव पाटील मुळे जळगाव जिल्ह्यात २५९१ माणसे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाचून तडफडून मेलीत. कोणाचा बाप मेला.कोणाचा पती मेला.कोणाची आई मेली.कोणाची पत्नी मेली.तरीही हा माणूस मंत्री? आमच्या डोक्यावर पुन्हा नागोबा? नाही खपवून घेणार.इतके नपुंसक नाहीत, जळगाव जिल्ह्यातील लोक.कि कोणीही औषधी व यंत्रसामग्री चे पैसे लुटून जाईल.दवाखान्यात गेलो आणि मेडिसीन चे पैसे असलेला खिसा कापला.काय संकट कोसळते? जर तसे लुटू द्यायचे असेल तर मग, सरकार ला कर आणि जीएसटी तरी का द्यावा?कर देतो ,तर हिशोब सुद्धा घेणारच.

इतिहास वाचला असाल,शिकला असाल तर ,याने सिंहासन लुटले,याने सोमनाथ लुटले,याने पुणे लुटले.दोष देतो आपण.तर मग,ज्याने कोरोना रुग्णांसाठी औषधी, यंत्रसामग्रीची रक्कम लुटली तो गुन्हेगार नाही का? आणि ते मंत्री?
मित्रांनो, जळगाव बरबाद झाले.रस्ते उखडले‌.हायवे उचडला.का? काय कारण आहे? सिमेंट, डांबर,खडी,रेती नाही.याला कारण आहे भ्रष्टाचार.तर मग,अपघाताने माणसे मेलीत तर दंगा करतात , आंदोलन करतात.येथे तर चक्क २५९१ बाया माणसे पोरं, कोरोनाबाधीत माणसे ऑक्सिजन वाचून तडफडून मेलीत.हेल्पलेस! याला जबाबदार आहेत,त्याकाळचे पालकमंत्री.मिनीस्टर गुलाबराव पाटील.पालकमंत्री काय फक्त ध्वजारोहण साठी नसतोच.तो डीपीडीसी चा अध्यक्ष सुद्धा असतो.त्याच्या अनुमतीने ,सहीने डीपीडीसी चा निधी वितरित होतो.तेंव्हा कुठे रस्ते,पाणी,गटार ,औषधी वगैरे साठी पैसा दिला जातो.आणि ही जबाबदारी होती गुलाबराव पाटील यांची.यांच्याकडून प्रामाणिकपणे कामाची अपेक्षा होती.किमान कोरोनाग्रस्त रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी तरी प्रामाणिक राहिले असते.इतर चोरीत आम्ही दुर्लक्ष केले असते.मंत्री असले म्हणून काय झाले?माणूस आहे तर चोरी तर करणारच.जित्याची सवय मेल्याशिवाय जात नाही.पण त्यालाही थोडीफार लाज लज्जा शरम असते.चोराला सुद्धा हृदय असते.तो दागिने,गाडी, टिव्ही चोरतो पण चुला,शेगडी,पीठ,मीठ,राकेल ,आगपेटी चोरत नाही.पण यांनी तर कुठेही मर्यादा पाळली नाही.चोराची नितीमत्ता तरी पाळली असती.नाही पाळली.आणि असा माणूस आमच्या डोक्यावर मंत्री? नाही सहन होणार.

शिंदेसाहेब, फडणवीस साहेब तुम्ही जबाबदार मंत्री आहात.सरकार तुम्ही बनवले.पण अशा लोकांना घेऊन चालवत असाल तर आम्हाला मान्य नाही.गुलाबराव पाटील यांना ताबडतोब मंत्री पदावरून हकालपट्टी करा.सरकारची अब्रू वाचवा.महाराष्ट्र राज्याची, जनतेची अब्रू वाचवा.तुमच्याकडे १६४ आमदार आहेत.एकावाचून सरकार लंगडे पडणार नाही.दुसरा कोणी मंत्री बनवा.गुलाबराव पाटील यांना हाकलले तर काहीच बिघडणार नाही.जाऊन जाऊन जातील कुठे?त्यांना ठाकरेसाहेब पायाशी ही उभे करणार नाहीत.जळगांव जिल्ह्यातील एकही आमदार,एकही खासदार त्यांच्यासोबत नाहीत.ते एकटेच आहेत.आणि यापुढे जळगाव ग्रामीण चे मतदार ही त्यांच्या सोबत असणार नाहीत.एक पाय मोडल्याने इंगळी लंगडी होत नाही.गुलाबराव पाटील नसल्याने तुमचे मंत्रीमंडळ लगंडे पडणार नाही.उलट तुम्ही जनमताची कदर केल्याबद्दल आम्ही जनता तुमच्या सोबत राहू.पण चोरांना सोबत घेतले तर मुळींच नाहीं.भ्रष्टाचार कारणे कांग्रेसचे केंद्र सरकार लोकांनी नाकारले.आज दयानिय अवस्था आहे.तशी अवस्था करून घेऊ नका.त्या वाटेने जाऊ नका.चोरांना मंत्री बनवू नका.

शिंदे साहेब,आपण आमच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले,आणि अडेलतट्टूपणाने गुलाबराव पाटील यांना मंत्री पदावर ठेवले तर तुम्ही जिंकले असे समजू नका.आम्ही हरलो असे ही समजू नका.आम्ही थेट प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती पर्यंत ही फरियाद नेणार आहोत.इडी च्या चौकशी ची मागणी करणार आहोत.आधीच पोलिसात आणि कोर्टात खटले दाखल आहेत.सरकारी दक्षता संस्थांचा वापर करीत आहोतच.
शिंदेसाहेब,तुमचा वापर किंवा गैरवापर संपला आहे.शिवसेना फोडायची होती,तोडायची होती.फोडली,तोडली.काम फत्ते झाले.मिशन सक्सेस झाले.आता तुमचे महत्व संपलेले आहे.आणि तुम्ही चोरांच्या सोबत आहात.पुढील भविष्य चांगले नाही.

कालच स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा झाला.भारतीय जनमानस ढवळून निघाले.आभिमान, स्वाभिमान घरोघरी जागवला,जागला.ते देशप्रेम होते.नाटक नव्हते.ड्रामा नव्हता.अशीच देशभक्ती चोरांच्या विरोधात जागवत आहोत.महाराष्ट्रात जागवत आहोत.आमचे उपोषण हे नाटक नाही.रागाचे रूदन आहे.आक्रंदन आहे.आक्रोश आहे.हे रूदन,हे आक्रंदन,हा आक्रोश काळजाला भेगा पाडणारे आहे.ही चोरांची चीड आहे.आम्ही मदत मागत नाहीत.आम्ही अनुदान मागत नाहीत.आम्ही मेहरबानी मागत नाहीत.आम्ही कर्जमाफी मागत नाहीत. ही क्रांती ची मशाल आहे.एकदा पेटली होती १९४२मधे.सरकार बदलले होते १९४७मधे.दुसऱ्यांदा पेटली होती १९७५मधे.सरकार बदलले होते १९७७मधे.तिसऱ्यांदा पेटली होती २०१२मधे.सरकार बदलले होते २०१४ मधे.आता पुन्हा ती परिस्थिती निर्माण करु नका. लोकांना चोरांची चीड येत आहे.कोणत्याही चोराला मंत्री बनवू नका.कोणत्याही चोराला मंत्री ठेवू नका.तुम्ही मंबईत बसून,मंत्री बनून कारभार करीत असले तरी सरकारची उलथापालथ आम्ही जनता करते.ही सुरूवात आहे.जो जास्त होरपळला तोच जास्त ओरडतो.तोच क्रांतीची ,बदलाची सुरुवात करतो.ती सुरूवात जळगाव मधून होत आहे.

… शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Related Articles

Back to top button