⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | दोन्ही ‘गुलाब’समोर तिसरा ‘गुलाब’ गळून पडणार!

दोन्ही ‘गुलाब’समोर तिसरा ‘गुलाब’ गळून पडणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांचा शनिवारी मोठ्या दिमाखात जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसंवाद यात्रा दौरा झाला. जळगाव – पाचोरा – एरंडोल – पारोळा या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं मोठ्या जोशात स्वागत झालं. कार्यकर्त्यांची मोठी फौज आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ जमली होती. मात्र गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या धरणगावात मात्र शिवसेनेला हवे तितके शक्ती प्रदर्शन करता आले नाही. किंबहुना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh)यांना कार्यकर्त्यांची हवी तितकी जमवाजमव करता आली नाही. सभेला उपस्थित अर्धे शिवसैनिक तर दौऱ्यातच सोबत फिरणारे होते. एकंदरीत काय तर नेहमीचे प्रतिस्पर्धी ना.गुलाबराव पाटील (Gulabrao patil) आणि गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या तगड्या जनसंपर्कात गुलाबराव वाघ मोठी मजल मारू शकतील यात साशंकता आहे.

जळगाव शहरात महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, पाचोर्‍यामध्ये वैशाली सूर्यवंशी, एरंडोल-पारोळामध्ये हर्षल माने यांनी आदित्य ठाकरे येणार म्हणून शिवसेनेची मूठ एकत्रितरित्या बांधली होती. आदित्य ठाकरे फक्त येणार या आशेनेच शिवसैनिक पेटून उठला होता. आदित्य ठाकरे तब्बल तीन वर्षांनी जळगाव जिल्ह्यात येत असल्याने शिवसैनिक मोठ्या उत्साहात होते. जळगाव जिल्ह्यातुन पाच आमदार फुटल्याने आदित्य ठाकरे कशाप्रकारे तोफ डागणार हे पाहणं उत्सुकतेच होत आणि आदित्य ठाकरे यांनी ‘गद्दारांना बाबाजी का ठुल्लू मिळाला’ या शब्दात त्यांच्यावर तोफ डागली सुद्धा. पाचोर्‍यामध्ये तर ‘गद्दारांना त्यांची लायकी समजली’अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी फुटीर शिवसेना आमदारांवर टीका केली.

जळगाव शहरात, पाचोर्‍यात आणि एरंडोल, पारोळ्यात ज्या प्रकारचा कार्यकर्त्यांचा असणारा उत्साह आणि शिवसेनेवरच प्रेम दिसून आले ते लक्षात घेता आदित्य ठाकरेंचा जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये दौरा यशस्वीच झाला. जिल्ह्यात पाऊल ठेवताच ‘मी गद्दारांचा मुखवटा फाडायला आलो आहे’ अशी चेतावणी आदित्य ठाकरेंनी दिली होती त्यामुळे ते स्फोटक भाषण करणार हे निश्चित होते. जिल्ह्यात जळगाव, पाचोरा, पारोळ्यात आदित्य ठाकरेंची बॅटिंग जोरदार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह देखील पाहावयास मिळाला. जळगाव ग्रामीण मतदार संघ म्हणजेच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदार संघात हाच दौरा ‘फिका फिका’ वाटला.

दौऱ्यावेळी ज्या कोणत्या गावांमधून आदित्य ठाकरे गेले त्या त्या गावांमध्ये ठाकरेंच जंगी स्वागत शिवसैनिकांनी केल. आदित्य ठाकरे यांनी देखील प्रत्येक शिवसैनिकांना मान देत त्यांच्या भावना लक्षात घेत त्या ठिकाणी थांबून शिवसैनिकांच्या स्वागताचे ऋण फेडलं. मात्र धरणगावामध्ये हे सगळं फारच सुन सुन वाटत होतं. कारण आदित्य ठाकरे आले, आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं, सभा जिंकली कार्यकर्त्यांची मन जिंकली, आपल्या तोफेखाली गुलाबराव पाटलांवर शाब्दिक आगगोळे टाकायचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक कार्यकर्ते आणि नियोजनाअभावी धरणगाव तालुक्यातला आदित्य ठाकरे यांचा दौरा ‘फेल’ गेला.

धरणगाव तालुक्यात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असे दिसून जरी आले असले तरी देखील वास्तविकरीत्या त्या ठिकाणी जळगाव शहरातलेच कार्यकर्ते जास्त होते. याचबरोबर इतर तालुक्यातून ठाकरे यांच्या ताफ्यात असलेले कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर होते. मात्र स्थानिक कार्यकर्ते ज्यांची खऱ्या अर्थाने त्या सभेमध्ये गरज होती. त्यांचा अभाव यास सभेमध्ये जाणवला. आता हे सगळं का झालं होतं? याच्या मागची दोन कारण महत्त्वाची. एक म्हणजे गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुक्यामध्ये असलेला वचक किंबहुना सन्मान आणि दुसरे म्हणजे गुलाबराव वाघ यांचे प्रभुत्व कमी असणे. गुलाबराव वाघ स्वतःला आमदारकीच्या रांगेत पाहत असले तरी दौऱ्यावरून गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर हेच सध्याचे तगडे प्रतिस्पर्धी असल्याचे पाहावयास मिळाले.

गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता त्यामुळे देवकर-पाटील वैर जळगाव ग्रामीण मतदार संघात सगळ्यांनाच माहित आहे. महाआघाडीची सत्ता गेल्याने आगामी निवडणुकीमध्ये देवकर विरुद्ध पाटील हीच प्रमुख लढत असेल असे स्पष्ट आहे. सध्या दोघांमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न गुलाबराव वाघ करत आहेत. गुलाबराव वाघ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. खुद्द जिल्हा संपर्क प्रमुखांनी तसे जाहीर केले असल्याने विजय आपलाच असा विश्वास गुलाबराव वाघ यांना वाटत आहे. स्वतः गुलाबराव पाटील यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न वाघ करत आहेत. मात्र असं नसून गुलाबराव देवकर हेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुलाबराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी आहेत हे काल झालेल्या दौऱ्यामध्ये पुन्हा दिसून आले.

एखाद्या उमेदवाराने स्वतःला विजयी समजण्याचा आत्मविश्वास योग्यच आहे परंतु गुलाबराव वाघ यांनी अगोदर दौऱ्यातील अनुभव लक्षात घेणे आवश्यक आहे. गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर दोघांनी अगोदर आमदारकी भूषवली असल्याने त्यांचा मतदार संघात तगडा जनसंपर्क आहे. वाघ अचानक चर्चेत आले असून ग्रामीण मतदारसंघांमध्ये स्वतःला कितीही भावी आमदार म्हणवून घेतले तरी त्यांचा पुढील प्रवास खडतर असल्याचे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून लक्षात आले. शिवसेनेची मते राज्यातील फूटमुळे विभागली जाणार असल्याने त्याचा लाभ आपसूकच गुलाबराव देवकर यांना होणार आहे. येत्या काळात राजकीय गणित बदलतील असं म्हटलं जात आहे मात्र वाघ यांनी योग्य वेळी योग्य भूमिका न घेतल्यास आज दिसलेले चित्र बदलेल असं वाटत नाही.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह