जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भूसावळ नजीक एका भरदाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भयंकर अपघात झाला आहे. यात ट्रकच्या चाकाखाली महिला आल्याने त्या जागीच ठार झाल्या. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. शितल शेषराव दिपके (वय-३७) रा.राधाकृष्ण नगर, जळगाव, ह.मु.औरंगबाद असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेषराव भिमराव दिपके हे पत्नी शितल यांच्यासोबत औरंगाबाद येथे वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात त्यांचे आई विमल व वडील भिमराव दिपके हे राहतात. अधुन मधून शेषराव व त्यांची पत्नी हे औरंगाबाद येथून घरी जळगावला येत असतात. शनिवार १३ ऑगस्ट रोजी शेषराव दिपके हे त्यांची पत्नी शितल सोबत जळगाव शहरात आईवडीलांच्या घरी आलेले होते.
दरम्यान, रविवारी १४ ऑगस्ट रोजी त्यांची भुसावळ येथे राहत असलेली काकू यांना भेटण्यासाठी शेषराव दिपके व त्यांची पत्नी शितल दिपके हे दुचाकी (एमएच १० बीडी ५००३) ने जळगावहून भुसावळला जाण्यासाठी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळून दुचाकीने जात असतांना भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
या धडकेत शितल ह्या दुचाकीवरून खाली पडून ट्रकखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर शेषराव यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेवून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.