Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । देवाला नैवेद्य अथवा प्रसाद दाखविताना गोड पदार्थ असतो. यात प्रामुख्याने मोतीचुरचे लाडू, शिरा, दूध यासारखे विविध पदार्थ प्रसाद म्हणून दाखविला जातो. परंतु, अमळनेर मंगळग्रह मंदिर संस्थांतर्फे अनोखा प्रसाद दाखविण्यात आला. म्हणजे भजींचा महाप्रसाद तो सुध्दा एक-दोन नव्हे तर चक्क २५ प्रकारच्या भजींचा प्रसाद दाखविला. दरम्यान, भविष्यातही अशा आगळ्यावेगळ्या महाप्रसादाचा संस्थांतर्फे आयोजन केले जाणार असल्याचे ग्रह मंदिर संस्थांच्या अध्यक्ष डीगंबर महाले यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या जागृत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देवस्थानातर्फे दर्शनासाठी आलेले भावीक तृप्त व्हावेत, समाधानी व्हावेत यासाठी आगळ्यावेगळ्या महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात मंगळ ग्रहाचे दोनच ठिकाणी मंदिर आहे. त्यापैकी एक म्हणजे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर आहे. या मंदिरावर वातावरणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या महाप्रसादाचा आयोजन केले जात असते. यात शुद्ध गावरानी तुपातील वरण बट्टी, गुळाची जिलेबी, वांग्याची भाजी तर तुलसी विवाहमध्ये चक्क आंबट चुक्याची भाजी अशा पद्धतीने महाप्रसाद या ठिकाणी असतात.
पावसाळा म्हटला म्हणजे अनेक ठिकाणी चहा आणि भजीचा बेत असतो. हेच डोळ्यासमोर ठेवून अमळनेर मंगळग्रह मंदिर संस्थानतर्फे दर्शनासाठी आलेले भाविक तृप्त व समाधानी व्हावेत महाप्रसादातून भाविकांना आगळावेगळा आनंद प्राप्त व्हावा; यासाठी संस्थांतर्फे चक्क २५ प्रकारच्या वेगवेगळ्या भजींचा महाप्रसाद तयार करून भाविकांना देण्यात आला. एक प्रकारे भजींच्या महोत्सवाचेच आयोजन भाविकांसाठी करण्यात आले.