बांगर तोंड आवर नाही तर तुझा बंदोबस्त करावा लागेल!, शिवसैनिकाचे ओपन चॅलेंज
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । शिवसेनेत फूट पाडून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यांनतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे काही पदाधिकारी शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत तर काही सहभागी होत आहेत. हिंगोलीचे आमदार (Santosh Bangar) संतोष बांगर हे देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने चांगलेच चर्चेत आले आहेत. बांगर यांना मात्र ‘गद्दार’ हा शब्द झोंबला असून जो कोणी गद्दार म्हणेल त्याच्या कानशिलात मारा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, त्यांचे आवाहन शिवसेना उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनीच स्विकारले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होत आहे. एक वेळा नाही तर लाखवेळेस आपण त्यांना म्हणणार असेही जाधव म्हणाले आहेत.
आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाले असून ते अधिक आक्रमकही झाले असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरुन समोर येत आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांनी गद्दारच नव्हे, तर शिव्या-शापही दिले होते. शिवसेनेशी कट्टर असलेले बांगर मात्र, बहुमताच्या दिवशी (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी झाले होते. आता शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रत्येक आमदाराला गद्दार म्हणण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे.
संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून त्यांच्यावर टिकेची झोड उडत आहे. विशेषत: सोशल मिडियावर ‘गद्दार’ अशा कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र, आपण गद्दार नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले होते. शिवाय खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असेही ठणाकावून सांगितले होते. शिंदे गटात सहभागी झालेल्या बांगरांना एकनाथ शिंदे यांनीच जिल्हाप्रमुख पद बहाल केले आहे. त्यानंतर मतदार संघात येताच आता कोणी गद्दार असा उल्लेख केला तर त्यांच्या कानशिलात लावा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांनी दिला आहे.