⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

अखेर खातेवाटप जाहीर : उपमुख्यमंत्र्यांना सर्वाधिक खाती, पहा कुणाला मिळाले कोणते खाते?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२२ । राज्यात भाजप-शिंदेसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३९ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. राज्यातील १८ आमदारांनी कॅबिनेटची शपथ घेतल्यावर तीन दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. नवीन खाते वाटपात अनेकांना मोठा धक्का बसला असून बहुतांश महत्वाची खाती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे ६ पेक्षा अधिक खाते असून इतर खात्यांचे वाटप देखील झाले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन केलं. या सरकारला स्थापन होऊन ३९ दिवस उलटल्यावर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. त्यात देखील छोटेखानी स्वरूप ठेवत केवळ कॅबिनेटच्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. १८ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातून जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांना ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा खाते देण्यात आले आहे तर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना पूर्वीचेच पाणी पुरवठा व स्वच्छता हे खाते कायम ठेवण्यात आले आहे.

वाचा कुणाला मिळाले कोणते खाते :
एकनाथ शिंदे – नगरविकास खाते, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, पर्यावरण, अल्पसंख्यांक विकास, सामान्य प्रशासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन
देवेंद्र फडणवीस – गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राज शिष्टाचार,
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल,पशु संवर्धन, पशु संवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्यक्रम खाते, मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित – आदिवासी विकास खाते
गिरीश महाजन – ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, पंचायती राज
अब्दुल सत्तार – कृषी मंत्री
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा व स्वच्छता
दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
उदय सामंत – उद्योग खाते
दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा, संरक्षण
मंगलप्रभात लोढा – पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य विकास व उद्योजकता
अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
सुरेश खाडे – कामगार
तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण
संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना, फलोत्पादन
शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क