⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगावच्या लोकसभेत मोठा ट्विस्ट ; अर्ज दाखल करण्यापूर्वीच ‘या’ उमेदवाराने घेतली माघारी, कारणही सांगितलं..

जळगाव न्यूज | 20 एप्रिल 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार दिले आहे. यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातही वंचितने उमेदवार रिंगणात उतरविले आहे. मात्र जळगावातील वंचितचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

दरम्यान, लोढा यांनी घेतलेल्या उमेदवारी माघारीबाबत चर्चा होतं असून उमेदवारी माघे का घेतली याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मतदारसंघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नाही. त्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा धडाका सुरुच आहे. वंचितकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती.

मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा उमेदवारी माघे घेतली आहे. उमेदवारी मागे घेत असल्याबद्दल प्रफुल्ल लोढा यांचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणं झालं आहे. प्रफुल्ल लोढा आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आणि कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

“कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कुणाच्या दबावाला मरेपर्यंत मी घाबरणारा नाही. स्वतःच्या मनाने उमेदवारी घेतली आणि स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेतली”, असं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असणार? याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.