जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । वर्ध्यातील (Wardha) एका भाजीपाला विक्रिकेत्याचा व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. भाजी विक्रेत्यानं चक्क नाल्याच्या पाण्यात भाजी धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झालाय. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट (Hinganghat) शहरातील हा धक्कादायक प्रकार असून यानंतर याप्रकरणी भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार डोके सुद्धा वर काढत आहे. अशातच भाजी विक्रेत्याकडून नालीत भाजी धुवून विक्री करणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखं प्रकार आहे. हिंगणघाट हरातील मनसे चौक येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या पाण्यामध्ये भाजीविक्रेता भाजी धुत असतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा खळबळजनक व्हीडिओ हजारो नागरिकांनी पहिला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हिंगणघाट शहरातील मनसे चौकात रस्याच्या कडेला हातगाडीवर मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते आपली दुकानात थाटतात. याच ठिकाणाहून हिंगणघाट शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक भाजीची खरेदी करत असतात. मात्र त्यांच्या नजरेआड असा किळसवाणा प्रकार सुरू असेल असं नागरिकांनी गृहीत धरलं नसेल. मात्र अचानक हा व्हिडिओ नागरिकांसमोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची हिंगणघाट पोलिसात पालिकेने तक्रार देताच पोलिसांनी भादवीच्या कलम 273 नुसार गुन्हा दाखल केला आहे.












