जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपबरोबर युती करणाऱ्या ४० आमदारांपैकी १० आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या अपक्ष आमदाराने हि माहिती दिली आहे. किशोर जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. यावेळी ते म्हणाले कि, जळगाव जिल्हातील एक आमदार कॅबिनेट बनणार असून राज्यातील १० शिवसेना आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या गटातील १० जणांना, तर अपक्षांपैकी तीन जणांना मंत्रिपद मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंसह दादा भुसे, उदय सामंत, संदिपान भुमरे आणि गुलाबराव पाटील असे एकूण पाच कॅबिनेट मंत्री आहेत. या पाचही जणांना कॅबिनेट मंत्रिपदं निश्चित मानले जात असल्याने अपक्ष आमदार म्हणाले. तर बच्चू कडू यांनाही कॅबिनेट मिळणार आहे असे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे ४०, तर अपक्ष १० आमदार आहेत. त्यामुळे एकूण ५० आमदारांमागे शिंदे गटाला १३ मंत्रिपदं मिळण्याचा अंदाज बांधला जात आहे. आधीच जे मंत्री होते, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. एकनाथ शिंदेंच्या बोलण्यानुसार आम्हा ५० जणांचं दायित्व त्यांच्याकडे आहे. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असंही जोरगेवारांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंच्या कामाचा धडाका, कामाचा आवाका आणि समज पाहूनच ४० आमदार तिथे गेले, असंही जोरगेवार म्हणाले.
यामुळे आता नक्की अपक्षांपैकी कोणाला कॅबिनेट, मंत्रिपद नसलेल्या कुणाला किमान राज्यमंत्रिपद मिळतंय, याची उत्सुकता आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होईल, असे संकेत कालच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यामुळे किमान पुढचा आठवडाभर तरी शिंदे-फडणवीस कॅबिनेट वाढीला मुहूर्त लाभणार नाही, असं दिसतंय.












