जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल मागील पीयूष कॉलनीत रविवारी दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान बंद घर फोडून १० तोळे साेने, पाच हजार रूपये रोख आणि चांदीचे दागिने, तर तुकाराम नगरात साई जीवन फ्लॉट फेज-२ मध्ये एकाच अपर्टामेंटमध्ये चार घरे फोडली. ही घटना देखील रविवारी दुपारी घडली. या पाचही ठिकाणी मिळून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ११ हजार रूपये रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, भर दिवसा झालेल्या या चोऱ्यांमुळे रहिवासी घाबरले आहेत.
रविवारी पीयूष काॅलनीतील रहिवासी तथा खडका येथे मेडिकल असलेले मनाेज भास्कर काेल्हे हे परिवारासह दुपारी २ वाजता मंदिरात गेले हाेते. लगेच परत येणार असल्याने त्यांनी बाहेरील मुख्य दरवाजाला कुलूप लावले नाही. ते ४.१५ वाजता मंदिरातून घरी परत आल्यावर दरवाजा उघडा दिसला. यानंतर चाेरी झाल्याचे लक्षात येताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड, हरीश भाेये, सचिन चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी सुमारे १० तोळे सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिने आणि पाच हजार रूपये रोख असा मुद्देमाल लांबवल्याचे कोल्हे यांनी पोलिसांना सांगितले. अवघ्या दोन तासांत चोरट्यांनी त्यांच्या घरात हात साफ केला. दरवाजाचे कुलूप ही लांबवणाऱ्या चोरट्यांनी घरातील शौचालयात मात्र अस्वच्छता करून ठेवली होती. यामुळे संताप व्यक्त झाला.
एकाच अपार्टमेंटमध्ये बंद घरात घातला धुमाकूळ
चोरट्यांनी साईजीवन फ्लॉट फेज २ मध्ये अपार्टमेंटमधील रहिवासी चंद्रशेखर विश्वकर्मा यांचे घर फोडले. यानंतर येथेच दोन घरे फोडली. गणपत पांडुरंग ठाकूर हे गाेदावरी फाउंडेशनमध्ये नाेकरीला आहे. ते दुपारी १२.३० वाजता मुलीला क्लासला साेडण्यासाठी गेले हाेते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा काेयंडा ताेडून आत प्रवेश केला. घरातील पाच हजार रूपये आणि त्यांच्या मुलीचे दागिने लांबवले. यानंतर चोरट्यांनी याच अपार्टमेंटमधील रहिवासी तथा इलेक्ट्रीशियनची कामे करणारे भरत विठ्ठल काेळी यांचे बंद घर फोडले. कोळी हे कामावर तर त्यांच्या पत्नी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या दरवाजाचे कुलूप ताेडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी एक हजार रूपयांची रक्कम लांबवली.
पांढऱ्या कारमध्ये आले चाेरटे
भर दुपारी साई जीवन फ्लॉट फेज-२ मधील बंद घरांना लक्ष करणारे चोरटे कारमधून आले होते, अशी माहिती समोर आली. ही घटना झाली तेव्हा काही लहान मुले अपार्टमेंटमध्ये खेळत होती. त्यांच्या माहितीनुसार एक पांढऱ्या रंगाची कार अपार्टमेटसमाेर येऊन थांबली. त्यातून दाेन-तीन लोक उतरले. ते काेणाकडे गेले माहिती नाही. मात्र, काही वेळातच ते परत गेले. त्यामुळे चाेरटे हायफ्राेफाईल असावे, असा अंदाज समोर आला. त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
विश्वकर्मा यांच्या घरी चाेरी
शहरालगतच्या तुकाराम नगरातील साई जीवन फ्लॉट फेज-२ येथे ए आणि बी असे दाेन विंग आहेत. यापैकी ए विंगमधील रहिवासी चंद्रशेखर सिताराम विश्वकर्मा हे फर्निचरचे काम करतात. घरातील सदस्य नातेवाईकांकडे गेल्याने ते दुपारी १२.३० वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले. ही संधी साधून चोरट्यांनी ए विंगला चौथ्या माळ्यावरील रहिवासी विश्वकर्मा यांच्या दरवाजाचा काेयंडा ताेडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेली सोन्याची चैन, अंगठी, लॉकेट असे सुमारे तीन लाख रूपयांचे दागिने लांबवले. विशेष म्हणजे याच ठिकाणी एका प्लास्टिकच्या पिशवीत रोख रक्कम होती. ती चाेरट्यांच्या नजरेस न पडल्याने तशीच पडून हाेती. घरात चोरी झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी विश्वकर्मा यांना दिली.