जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरातील अनेक परिसरात रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. ही बाब स्थानिक नगरसेवकांना लक्षात आणून दिली. मात्र, त्यांनी नगरपालिका आम्हाला पुरेसे मुरूम उपलब्ध करून देत नसल्याने आम्ही हतबल आहोत, असे सांगितले. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना व आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, आता निवेदन दिल्यांनतर तरी रस्त्याचा प्रश्न पावसाळा संपण्या अगोदर मार्गी लावतील का ? अशी चर्चा शहारत होत आहे.
चाळीसगाव शहरातील सुयश लॉन्स समोरील क्रांतीनगर या परिसरामध्ये रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. या परिसरामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत. आता पावसाळ्यामध्ये या क्रांती नगर रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की परिसरातील लोकांना येण्या-जाण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. या परिसरांमधून शहराकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दैनंदिन कामासाठी, रोजगारासाठी तसेच शाळा, कॉलेजला जाणाऱ्यांची संख्या या परिसरांमधून जास्त आहे. स्थानिक नगरसेवकांना या रस्त्याची समस्या अनेक वेळा सांगूनही स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना याआधी सांगितले की नगरपालिका आम्हाला पुरेसे मुरूम उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे आम्ही हतबल आहोत.
हे नागरिक नगरपालिकेचा कर न चुकता भरतात. तरी देखील यांना रस्त्या सारखी प्राथमिक सेवा ही नगरपालिका देऊ शकत नसेल तर यापुढे आम्ही कर भरावा का? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर गणेश गायकवाड, राहुल निकम, कविता मसाळ, खंडू बागुल, वंदना राठोड, दिपाली कदम, अरुण बागुल, कैलास पंडित माने, सुनील निकम, कृष्णा भावसार, भावना पाटील, जंगलु अंदोरे, नीता मसाळ, शुभांगी चव्हाण, निर्मला कवडे, शामराव कवडे. तसेच अन्य लोकांच्या स्वाक्षर्या आहेत.