⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | मोठी बातमी : एकनाथ शिंदेंनी मागितली राज्यपालांकडे वेळ, आमदारांना ऑनलाईन दाखविणार

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंनी मागितली राज्यपालांकडे वेळ, आमदारांना ऑनलाईन दाखविणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । शिवसेनेत सध्या उभी फूट पडली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे ४६ आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. बंडखोरांना पुन्हा बोलाविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी एक पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं होते. पत्रकात सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत शिवसेना प्रतोदांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच नवीन प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वेळ मागितल्याचे वृत्त समोर येत असून सोबत असलेल्या आमदारांना ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यासाठी वेळ मागितल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात राज्यातील जवळपास ४० आमदार सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काहीवेळापूर्वी माहिती देत आमदारांची संख्या आणखी वाढणार असल्याचे म्हटले होते. शिवसेनेकडून बंड मोडून काढण्यासाठी सकाळपासून बैठकांना सुरुवात केली होती. दुपारी शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एक पत्र काढण्यात आले होते. पक्षाकडून सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही, असे त्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट करीत थेट प्रतोदांचा आदेश आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे.

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. शिंदे यांनी तसे पत्र बहुदा राज्यपालांना देखील पाठविले आहे. एकनाथ शिंदे यांनी ३४ आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठविले आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःसोबत असलेल्या आमदारांचे पत्र पाठविले असले तरी प्रत्यक्षात त्यांना समोर आणणे आवश्यक आहे. राज्यपाल रुग्णालयात दाखल असले तरी ते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची ऑनलाईन वेळ मागितली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.