जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही सर्व एकत्र आहोत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर आम्ही चालणारे असून तेच घेऊन पुढे चालणार आहोत. आज माज्यासोबत ४६ आमदार असून ते संख्याबळ आवश्यकतेपेक्षा अधिक आहे. आज संध्याकाळी सर्व आमदारांची बैठक घेणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले कि, माझ्याकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कि नाही हा प्रश्न त्यांचा आहे. नागपुरात पोहचलेले आ.नितीन देशमुख यांनी अनेक आरोप केले. पोलिसांनी मारहाण केली. काहीतरी इंजेक्शन टोचण्यात आले असे आरोप देशमुख यांनी केले आहे. परंतु, जर आम्ही तसे केले असते तर त्यांना नागपुरात सोडायला आमचे दोन लोक गेले असते का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे आज दिवसभर माध्यमांशी बोलत असून अद्याप कोणताही निणय घेतला नसल्याचे सांगत आहे.
हेही वाचा : विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती? शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रश्न
आम्ही बाळासाहेबांचे सैनिक असून आम्हाला बंडखोर म्हणू नका. माझ्यासोबत ४६ आमदार असून ते एक मोठे संख्याबळ आहे. शिवसेना पक्ष हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित पक्ष आहे. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची असून आम्ही त्याचे समर्थन करतो. माझ्यासोबत असलेले ४६ आमदार हिंदुत्वाच्या विचारांचे स्वागत करतो. जनतेच्या हिताची हि बाब असून नागरिकांचा विचार आम्ही मांडत आहोत. रश्मी वहिनींशी आम्ही नेहमी बोलत असतो, काल देखील बोलणे झाले होते. अद्याप आमचा कोणताही निर्णय झाला नसून माझ्याकडून कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या कोणत्याही नेत्यांच्या मी संपर्कात नसून सत्तेसाठी आम्ही कधीही हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सध्या शिंदे यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदार गुवाहाटी येथे असून आज सायंकाळी आमदारांशी चर्चा केल्यावर आम्ही आमची भूमिका जाहीर करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सरकार राहणार कि कोसळणार यावरून सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.