⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | MLC Election : नाथाभाऊ.. ओळखा पाहू रंग बदलणारा सरडा कोण?

MLC Election : नाथाभाऊ.. ओळखा पाहू रंग बदलणारा सरडा कोण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । चिन्मय जगताप । राज्याचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) निमित्ताने पणाला लागलेली आहे. आजवर खडसेंनी लोकांना मोठे करण्यासाठी घेतलेले कष्ट, मेहनतीचे चीज होणार का? ते खडसेंच्या खाल्लेल्या मिठाला जागणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. खडसेंच्या विजयासाठी एक मत कमी पडत असून भाजपकडून त्यांच्या पराभवासाठी फोडाफोडीचे राजकारण खेळले जाणार असल्याने नेमके आपल्यासोबत असल्याची ग्वाही देणारे खरंच आपल्या सोबत आहेत कि वेळ पाहून रंग बदलणारे ते सरडे आहेत हे खडसेंना आताच ओळखावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा देण्यात आलेली संधी सोडून खडसेंना चालणार नसून त्यासाठी आतापासूनच व्युव्हरचना आखत हक्काचे मतदार सुरक्षित करणे गरजेचे ठरणार आहे.

भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी एकनाथराव खडसे यांना ते मतदान करणार असल्याबाबत मोठे विधान केले आहे ते म्हणाले कि, मी भारतीय जनता पक्षाचा निस्सीम कार्यकर्ता असून पक्ष सांगेल त्यांनाच मी मतदान करणार आहे. तर दुसरीकडे खडसे यांचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले कि,  ‘मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करेन, यात मी एकनाथ खडसे असो की इतर कुणी असो, त्यांना मतदान करेन, असे ते म्हणाले. एकीकडे आ.संजय सावकारे खडसेंचे निकटवर्तीय तर आ.पाटील खडसेंचे कट्टर विरोधक असल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु दोघांचे सध्याचे वक्तव्य लक्षात घेता खडसेंना देखील त्याप्रमाणे रंग बदलणारे सरडे ओळखावे लागणार आहे.

जगातील प्रत्येक प्राण्याची स्वतःची खास वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे तो आपले जीवन जगत असतो. सरड्याला देखील अशीच काही वैशिष्ट्ये मिळाली आहेत. सरड्याची एक प्रजाती शॅमेलिऑन हा सरडा सुरक्षिततेनुसार आपला रंग बदलतो. शिकारी टाळण्यासाठी सरडा स्वत: आहे त्या वातावरणात मिसळून स्वतःला समान रंगात बदल करतो. सरडा आपला रंग बदलून स्वत: चा बचाव करतो. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पुढाऱ्यात हाच पाहायला मिळतो. आपली पोळी भाजून घेण्यासाठी राजकारणी खोटं बोलतात किंवा ऐन वेळी तडजोड करतात हे नक्की आहे. मात्र येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत खडसेंना आजवर ज्यांनी आपले मानले आहे ते कितपत खडसेंना साथ देणार हा मोठा प्रश्न आहे. खडसे भाजपातून बाहेर पडल्यावर भाजपचे काही आमदार देखील खडसेंच्या सोबत आहेत अशी चर्चा होती, मात्र खडसेंनी नकार दिल्याने त्यांनी पक्ष सोडला नव्हता अशी चर्चा होती. सध्या विधान परिषदेच्या निमित्ताने तेच आमदार खडसेंच्या सोबत आले तर खाल्ल्या मिठाला ते जागले असे म्हणावे लागेल आणि नाही साथ दिली तर पक्षादेश पाळला असे म्हणावे लागेल.

हेही वाचा : MLC Election : खडसेंच्या भवितव्यावर सट्टा बाजार तेजीत, जळगावात लागताय लाखोंच्या पैज

खडसे विधानमंडळात पोहचल्यावर मंत्रीपद त्यांना जवळपास निश्चितच आहे. एकनाथराव खडसे मंत्री होणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. खडसेंच्या दारी पुन्हा लाल दिव्याची गाडी येणार याच चर्चेने अनेकांचे आतापासूनच धाबे दणाणले आहे. अर्धा तप बाजूला राहिल्याने खडसेंनी लोकांना जवळून अनुभवले आहे. आजवरच्या राजकारणात भेटलेल्या सर्वांचीच कुंडली खडसेंच्या हाती असल्याने काहींच्या मनात धाकधूक आहे. आपण खडसेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची जाणीव आता होऊ लागल्याने कुठे नाराजीचे वातावरण आहे. खडसे पुन्हा परतणार असल्याने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कधी महाजनांच्या मागे असलेला कार्यकर्त्यांचा गराडा पुन्हा एकदा खडसेंच्या मागे दिसू लागला आहे. आमदारकीचा अर्ज भरतानाच हे वातावरण आहे तर खडसे मंत्री झाल्यावर आणखी काय वातावरण असेल याची चिंता विरोधकांना लागून आहे.याच मळे त्यांना कोणी दुखवू इच्छित नाही. मात्र दगाफटका झालाच तर पुढे काय ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र हा करणार कोण ? जुने सहकारी करणार कि आत्ताचे कट्टर विरोधक तो करणार ? हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, एकनाथराव खडसे हे आपल्यासाठी आदर्श होते, आणि यापुढेही राहणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी आवर्जून नमूद केल्या असल्याने आता राजकारणाची दिशा ते बदलतात आणि खडसेंना मतदान करतात कि चंद्रकांत पाटील कट्टर वैर पाळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्यात देखील खडसेंच्या मागे मोठा बॅकअप असल्याचे म्हटले जाते. खडसेंना पंकजा मुंडे यांच्या समर्थक आमदारांचा देखील पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. सध्यातरी सर्व चर्चाच असल्या तरी खडसेंना उद्याच्या दिवसातच सर्व खेळी खेळाव्या लागणार आहे. आपल्या पक्षाचा असो, मित्र पक्षाचा असो किंवा विरोधी भाजपचा आमदार असो, त्यांच्याशी बोलून आपले हक्काचे मत निश्चित करणे खडसेंना आवश्यक आहे. रंग बदलणाऱ्या सरडयांवर डाव न लावता आहे त्याच आमदारांच्या सोबतीने पुढे जात एखाद आमदार हाताशी ठेवला तरी भागणार आहे.

हेही वाचा : MLC Election: विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?

author avatar
टीम जळगाव लाईव्ह