⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

MLC Election : खडसेंच्या भवितव्यावर सट्टा बाजार तेजीत, जळगावात लागताय लाखोंच्या पैज

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) घटिका जवळ येत असून मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणूक होणारच हे निश्चित झाले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नाकावर टिच्चून भाजपने आपला उमेदवार निवडून आणला आणि संजय पवारांचा गेम केला. राज्यसभेतील विजयामुळे भाजप पुन्हा जोशात असून जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. खडसे विधान मंडळात येण्यामागे तीन महत्वाची कारणे सध्या चर्चेत आहेत. एक म्हणजे खडसेंचे पुनर्वसन, दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आणि तिसरे म्हणजे महाविकास आघाडीला बळ मिळेल. सुरुवातीला खडसे निवडूनच येणार असे चित्र स्पष्ट दिसत असताना आता मात्र जरा धाकधूक वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. विधान परिषदेत खडसेंचे पुढील भवितव्य काय असणार यावर जळगावात सध्या सट्टा बाजार तेजीत आहे. अनेकांनी पैजा लावण्यास सुरुवात केली आहे.

राज्यसभा निवडणूक नुकतेच पार पडली. अगोदर सर्व सुरळीत होणार असे वाटत असले तरी भाजपच्या मनात काहीतरी वेगळेच होते. महाविकास आघाडीचे नेते अतिआत्मविश्वास बाळगण्यात अपक्षांच्या भरवशावर किल्ला लढवायला निघाले होते तर भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संकट मोचक गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आमदारांना आपल्यासोबत जुळवून ठेवण्यात व्यस्त होते. भाजपने खेळलेली खेळी यशस्वी करून दाखवली आणि पहिल्या पसंतीची मते आपल्या उमेदवाराच्या पारड्यात पाडली. महाविकास आघाडीचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. बहुमत असताना देखील महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी नेत्यांकडून सुरु असलेली अंतर्गत खेळी कार्यकर्त्यांना देखील ठाऊक होती.

जळगावात संकटमोचक आ.गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी तर राज्यसभा निवडणुकीला जाहीरपणे फेसबुकला पोस्ट करीत १ लाखांची पैज लावली होती. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने ते आव्हान स्वीकारले देखील होते. विधानसभा निवडणुकीसाठी देखील पैजेचा बाजार जोरात सुरु झाला आहे. जळगावात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आपसात पैज लावत असून एकनाथराव खडसे यांच्या विजयावर त्या पैज आहेत. एकनाथराव खडसेंचा विजय होणार कि नाही यावर सुरु असलेला सट्टा बाजार तेजीत असून भाजप कार्यकर्ते आता देखील खडसेंच्या पराभूत होण्यावर ठाम आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा असलेला आत्मविश्वास खरा ठरेल कि ते अतिआत्मविश्वासात पैज गमावून बसतील हे तर दि.२० रोजीच समजणार आहे. सुरुवातीला मोठ्या जोशात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते खडसेंच्या विजयावर ठाम असून ठोसपणे पैज लावायला अजूनही कुणी समोर आलेले नाही.

हेही वाचा : MLC Election : राष्ट्रवादीला धक्का; खडसेंना जिंकण्यासाठी कमी पडतंय एक मत!

एकनाथराव खडसे यांची भाजपात घुसमट झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसेंना विधानमंडळाच्या बाहेरच रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. खडसे, फडणवीस आणि महाजन वैर सर्वांनाच परिचित आहेत. खडसे बाहेरच कसे राहतील यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. खडसेंच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा देखील लागला. राज्यपाल नियुक्त सदस्यांकडे पाठविलेल्या यादीत देखील खडसेंचे नाव होते मात्र ती यादी देखील अद्याप प्रलंबित आहे. विधान परिषद निवडणुकीला खडसेंना उमेदवारी देणार नसल्यास निवडणूक बिनविरोध करण्यास भाजप तयार असल्याचा गौप्यस्फोट एमआयएमचे खा.इम्तियाज जलील यांनी केला होता. एकंदरीत खडसे भाजपला नकोच असून त्यासाठी ते काहीही खेळी करू शकतात. खडसे विजयी होणार कि नाही यावर सध्या अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.

जळगावात ज्याप्रमाणे एकनाथराव खडसेंच्या विजयाबद्दल पैज लावल्या जात आहेत तसेच काहीसे चित्र राज्यात देखील असणार आहे. भाजपचे अरविंद देशमुख विधान परिषद निवडणुकीत देखील आपल्या नेत्यांवर विश्वास दाखवून जाहीर पैज लावणार का? आणि त्यांची पैज राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष आणि खडसेंचे निकटवर्तीय अशोक लाडवंजारी स्वीकारणार का? हे पाहणे सध्या औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या वेळी देशमुख यांच्या पैजेची मोठी चर्चा राज्यात झाली होती.