आषाढी वारी : विठ्ठलाची भक्ती न्यारी, तरुणाईला देखील वेड लावी.. कन्नड घाटात तरुण ८ वर्षापासून करताय वारकऱ्यांची सेवा!
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । पंढरीची वारी चुकू देवो ना हरी.. गेल्या अनेक वर्षांची पायी वारीला जाण्याची परंपरा आजही अनेकांनी अखंडित ठेवलीय. जळगाव शहरातून देखील दरवर्षी वारी पंढरपूरला जात असते. वारीमध्ये सहभागी होता येत नसले तरी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून जळगाव शहरातील काही तरुण गेल्या ८ वर्षापासून भक्तिभावाने सेवा देत आहेत. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष या तरुणांची संधी हुकली असली तरी यंदा मात्र ती संधी चालून आली आहे. कन्नडच्या घाटात प्रितेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचा एक गट दरवर्षी वारकऱ्यांना चहा, पाणी, नाश्ता, औषधी देणे, त्यांची सेवा करण्याचे कार्य करीत आहे.
अखंड महाराष्ट्राचे दैवत विठूराया. विठ्ठलाची भक्ती आणि आषाढीची वारी वारकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि भक्तीभावाचा विषय आहे. आषाढीच्या वारीला दरवर्षी लाखो वारकरी जात असतात परंतु आजवर कधीही कुणीही शिस्त मोडलेली नाही. राज्याच्या विविध कान्याकोपऱ्यातून पायी वारी, दिंडी घेऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्ताव करीत असतात. वारीमध्ये अनेक वर्ष सहभागी होऊन विठूमाउलीच्या दर्शनाची आस लावून जाणारे वारकरी देखील महाराष्ट्राने पहिले आहेत. गेली दोन वर्ष कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने वारकऱ्यांची वारी चुकली होती. आपल्या विठुरायाचे दर्शन होऊ न शकल्याने लाखो वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता.
दरवर्षी निघणाऱ्या पायी वारीत सहभागी होण्याची इच्छा अनेकांना असते परंतु काही कारणास्तव ते सहभागी होऊ शकत नाही. वारीत सहभागी होता येत नसले तरी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मात्र विठ्ठलाचे भक्त शोधतच असतात. जळगाव शहरातून देखील दरवर्षी पायी वारी पंढरपूरच्या दिशेने जात असते. जळगाव शहरातून दि.१४ रोजी रोजी पायी वारी पंढरपूरच्या दिशेनं निघाली आहे. दि.१९ रोजी वारी रांजणगावहून कन्नडच्या दिशेने निघणार आहे. जळगावातील तरुणांचा एक गट दरवर्षी प्रितेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांची कन्नडच्या घाटात सेवा करीत असतो. यंदा देखील दि.१९ रोजी रात्री ८ वाजता सर्व तरुण कन्नडसाठी रवाना होणार आहेत.
हे देखील वाचा : SSC 10th Result 2022 : धाकधूक वाढली, उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, ‘जळगाव लाईव्ह न्यूज’वर पाहू शकता निकाल
जळगावातील तरुणांचा हा गट गेल्या ८ वर्षापासून वारकऱ्यांच्या सेवेची संधी सोडत नाही. गेली दोन वर्ष कोरोना असल्याने ही संधी हिरावली गेली होती. यंदा मात्र पुन्हा हीच संधी चालून आली आहे. तरुणाईकडून कन्नडच्या घाटात पहाटे पहाटे पाऊस, ऊन, थंडी असताना देखील वारकऱ्यांची सेवा केली जाते. वारकऱ्यांना चहा, पाणी, नाश्ता, आवश्यक औषधी देण्यात येते. तसेच वयोवृद्ध वारकऱ्यांचे पाय दाबून देणे, अंग दाबून देण्याची सेवा देखील तरुण करीत असतात. विठू माऊलीने आपल्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला दिली आहे. आपण सर्वांनी या आधीही यथाशक्ती तन-मन-धन लावून सर्व वारकऱ्यांचे मनोभावे सेवा केलेली आहे. यंदा देखील सर्वांनी उपस्थित राहावं, असे आवाहन करीत विठू माऊलीच्या कृपा आशिर्वादाने संपूर्ण जगातून सर्व प्रकारचे दुःख, महामारी त्रास दूर होतील अशी प्रार्थना तरुणाईने केली आहे.