⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी : जळगावात किरणकुमार बकालेंविरुद्ध गुन्हा दाखल, असे आहेत कलम..

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होताच मराठा समाज आक्रमक झाला होता. नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी बुधवारी रात्री उशिरा बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. मराठा समाज राज्यभरात प्रचंड आक्रमक झाला असून बकाले यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी बकाले यांच्याविरुद्ध विनोद देशमुख यांनी फिर्याद दिली असून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस अंमलदार अशोक महाजन यांच्याशी फोनवर बोलत असताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. दोघांमधील संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आ.मंगेश चव्हाण आक्रमक झाले होते. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर मंगळवारी रात्री उशिरा बकाले यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. तसेच बुधवारी मराठा समाजासह विविध संस्थांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली होती. बकाले यांना तातडीने निलंबित करा अशी त्यांची मागणी होती.

तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्याचे निलंबन न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ही दिला होता. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी त्यास निलंबित करण्यासह खातीनिहाय चौकशी लावतो असे आश्वासन दिले होते. बुधवारी रात्री उशिरा पोलीस महानिरीक्षकांनी याबाबत आदेश काढत निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन केले होते. तसेच प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून सहाय्यक अधीक्षक चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली होती.

गुरुवारी जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. निरीक्षक बकाल आणि एलसीबीचे हजेरी मेजर अशोक महाजन यांना मी ओळखतो. दि.१४ रोजी माझ्या मोबाईलवर एक ऑडिओ क्लीप आली. मी क्लिप ऐकली असता निरीक्षक बकाले हे सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

स्त्रियांना लज्जास्पद वाटेल आणि समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य बकाले यांनी केले आहे. मी मराठा समाजाचा असून अशा वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. विनोद पंजाबराब देशमुख रा.मधुबन, महाराष्ट्र बँक कॉलनी, महाबळ, जळगाव यांच्या फिर्यादीवरून किरणकुमार भगवानराव बकाले यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १५३-अ, १५३-ब, १६६, २९४, ५००,५०९ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अरुण धार हे करीत आहेत.