जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात अनेक गावठाण जागा आहेत. ज्यांच्या मालकी हक्कांची अधिकृत नाेंदच नाही. केंद्राच्या स्वामित्व हक्क याेजनेंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ड्राेनच्या मदतीने माेजणी करण्यात येत आहे. त्यामुळे लाखाे मालमत्तांना सनद मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील महसूल क्षेत्राची माेजणी ब्रिटीश काळात १९१९ मध्ये झाली हाेती. तेव्हा पहिला सिटी सर्व्हे झाला हाेता. त्यानंतर ३०-३५ वर्षांनंतरच मालमत्तांची माेजणी झाली. ती देखील अर्धवटच झाली. जिल्ह्यतील २७५ गावांची पारंपारिक पध्दतीने माेजणी झाली. केंद्र शासनाच्या स्वामित्व याेजनेतंर्गत जिल्ह्यात डिसेंबर २०२१पासून ड्राेनच्या माध्यमातून मालमत्तांची माेजणी करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ११५० महसुली गावांतील मालमत्ता, शेतजमीन, गावठाण जमिन यांची माेजणी ड्राेनच्या सहाय्याने केली जात आहे. आतापर्यंत यावल, भुसावळ, पाचाेरा, चाळीसगाव, भडगाव, पाराेळा या सहा तालुक्यांची माेजणी पूर्ण झाली असून अमळनेर तालुक्याची माेजणी अंतिम टप्प्यात आहे . सात तालुक्यांतील ६१६ गांवाची माेजणी पूर्ण झाली आहे.
असा हाेईल फायदा ड्राेनच्या मदतीने अत्याधुनिक पद्धतीने हाेत असलेल्या माेजणीमुळे प्रत्येक गावातील घर, शेत, गावठाण जमीन यांची माेजणी केली जाणार आहे. त्यामुळे ज्या मालमत्तांची महसूल दरबारी नाेंदच नाही अशा मालमत्तांची नाेंदणी हाेईल. प्रत्येक मालमत्तेचा मालकी हक्क निश्चित हाेईल. त्यामुळे लाखाेंच्या संख्येने गावठाण जमिनीची कागदपत्र, सातबारा उतारे नसल्याने त्या जागांवर घर व इतर व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येतात ही अडचण दूर हाेईल. शासनाच्या गावपातळीवर असलेल्या सरकारी जागांची नाेंद झाली आहे.
अाॅनलाइन उपलब्ध असेल प्राॅपर्टी कार्ड ड्राेनद्वारे माेजणी झाल्यानंतर नकाशा तयार करण्याचे काम सुरु अाहे. त्यानंतर भूमिअभिलेख विभागातर्फे प्रत्यक्ष जागेवर जावून चाैकशी करून मालकी हक्काची खात्री करून निश्चित केला जाणार अाहे. एकदा मालमत्तेचा मालकी हक्क निश्चित झाल्यावर मालमत्ताधारकाला भूमिअभिलेख विभागाकडून सनद दिली जाणार आहे. या सनदीवर मालमत्तेचे क्षेत्र, जागेचा नकाशा, मालमत्ताधारकांच्या नावांचा समावेश असेल. विशेष म्हणजे आधारकार्ड प्रमाणे संबधितांना ही सनद ऑनलाइन उपलब्ध हाेईल, असे जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी एम. एस मगर यांनी सांगितले.