जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये उघडकीस आलीय. आकांक्षा शरद पगारे असे तिचे नाव असून तिने आत्महत्या का केली?याबाबत अद्यापही कळू शकले नाहीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आकांक्षा ही आयुध निर्माणी वसाहतीमधील मॉडिफाइड क्वार्टर नंबर १९४ मध्ये आई-वडील, भाऊ, दोन बहिणींसह राहते. ती निंभोरा (ता.भुसावळ) येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची विद्यार्थिनी आहे. बुधवारी सकाळी ती बराच वेळ घरात कुणालाही दिसली नाही. त्यामुळे बहिण तिला शोधण्यासाठी घराच्या गच्चीवर गेली. यावेळी आकांक्षा ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. यामुळे संपूर्ण कुटुंबीय हादरले. त्यांनी गळफास घेण्यासाठी वापरलेली ओढणी कापून आकांक्षाला खाली उतरवून तातडीने आयुध निर्माणीच्या दवाखान्यात नेले.
मात्र, डॉ.समीर महाकाळे यांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तिथे शवविच्छेदन झाले. आकांक्षाचा भाऊ वैभव पगारे यांनी वरणगाव पोलिसांत दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, आकांक्षाने आत्महत्या का केली? हे कारण तूर्त समोर आलेले नाही.