⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चिंचपाणी धरणात पोहायला गेलेला तरुण बुडाला

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑक्टोबर २०२३ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील चिंचपाणी धरणात पोहायला गेलेल्या आदिवासी बढाई पाड्यातील तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१०) दुपारी घडली. दरम्यान घटना घडून अवघ्या चार तासांनी घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चिंचपाणी धरणावर मित्रांसमवेत पाेहायला गेलेला पिंटू डोंगरसिंग पावरा (वय ३५) रा.बढाई पाडा बिडगाव हा धरणात पोहत असताना अचानक पणे दिसेनासा झाला. मित्रांना लक्षात आले की आपला मित्र हा धरणात बुडाला आहे. सोबत असलेल्या मित्रांनी जवळच असलेल्या बढाई पाडा येथील ग्रामस्थांना घटनास्थळी बोलावून याबाबत आपबीती सांगितली.

तरुण धरणात बुडाला असल्याची बातमी कळताच बिडगाव परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत याबाबत सविस्तर माहिती घेऊन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. धरणाची खोली जवळपास अंदाजे शंभर फुटाच्यावर असल्याने रात्री अंधारात तरुणाच्या मृतदेहाला शोधणे कठीण असल्याने बुधवारी सकाळी एनडीआरएफ ची रेस्क्यू टीम धुळे येथून येणार असून ते बुडालेल्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेणार आहेत.