देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानामुळे जळगावात सुप्रिया सुळे घाबरल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । नुकत्याच मुंबई मध्ये झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस त्यांनी मी महाविकास आघाडीचा बाबरी ढाचा पडणार असे विधान केले होते. या विधानामुळे मी घाबरले आहे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोमणा लगावला. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हश्या पसरला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे आज जिल्हा दौर्यावर होत्या. या दौर्यात त्यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत खा. सुळे यांनी संवाद साधला. खा. सुप्रिया सुळे यांना फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या विधाना बद्दल विचारले असता त्यांनी फडणवीसांना टोमणा मारत उत्तर दिले. यावेळी त्या म्हणाल्या कि, देवेंद्र फडणवीस यांच्या मी महाविकास आघाडीचा बाबरी ढाचा पडणार या विधानामुळे मी घाबरले आहे.
पुढे त्या म्हणाल्या कि, केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याबदल्यात मोदी सरकारने महागाईचे गिफ्ट देशातील जनतेला दिले असल्याची टिका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. इंधन दरवाढीच्या विषयात राज्य सरकारचे कर मुळात केंद्रापेक्षा कमी असल्याचा खुलासा त्यांनी केला. केंद्र सरकार सेसच्या माध्यमातून करवसूली करून जनतेला सुविधा देत नाहीये. इतर कुठल्याही प्रश्नांपेक्षा महागाई हेच सध्या आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात आम्ही संसदेत सरकारसोबत चर्चेची मागणी केली. मात्र सरकार अद्यापपर्यंत याविषयावर चर्चा करायला तयार नसल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांचा अपमान सहन करणार नाही
पक्ष कुठलाही असु द्या कुठल्याही महिलेचा अपमान सहन केला जाणार नाही. महिलेविषयी आक्षेपार्ह भाषा कुणी वापरत असेल तर ते योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या महिला त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. कुठलाही गोंधळ त्यांनी केला नसल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली.