⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव जिल्हा दूध संघातून खडसेंचा तो फोटो हटवला !

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ डिसेंबर २०२२ | चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष झाले आहेत. निवडुकी वेळी त्यांनी खडसेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारताच कॅबीनमधील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोटो हटवला आहे.

अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष कॅबिनमध्ये असलेला एकनाथराव खडसे यांचा फोटो हटवण्यात आला. जळगाव जिल्हा दूध संघावर गेल्या सात वर्षांपासून खडसे यांचे एकहाती वर्चस्व होते मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत खडसे यांची सत्ता संपुष्टात आली.

कॅबीनमधील खडसे यांचा फोटो हटविण्यात आल्यामुळे पहिल्याच दिवसापासून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली अध्यक्षपदाची सुरुवात आक्रमकरित्या केल्याचे दिसून आले. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला चाळीसगाव मतदार संघ सोडून थेट खडसे यांना त्यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात आव्हान दिले होते. एवढेच नव्हे तर चांगल्या मतांनी विजय देखील संपादन केला.

मंत्री महाजनांच्या सूचनेनुसार दूध संघातील कर्मचाऱ्यांनी खडसेंचा फोटो हटवून बाजूला केला त्यानंतर मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना अध्यक्षांच्या खुर्चीत बसविले.यावेळी दूध संघाचे संचालक चिमणराव पाटील, संजय पवार, रोहित निकम, अरविंद देशमुख यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. जिल्हा बँकेत मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांचा फोटो हटविण्यावरुन वाद झाला होता. आता जिल्हा दूध संघात आमदार एकनाथराव खडसे यांचा फोटो हटविल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.