जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहे.
राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीव्दारे निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे. त्याबाबतची सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळ निहाय कौशल्य चाचणीची अर्हता पुढीलप्रमाणे
सरळ प्रवेश प्रक्रिया :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू किंवा ज्यांचे वय दि. 19 वर्षातील 1 जानेवारी, 2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असावे.
अशा खेळाडूंना संबधित खेळाबाबतची चाचणी तज्ञसमिती समक्ष देवून प्रवेश (50 टक्के प्रवेश ) निश्चित केला जाणार आहे.
खेळनिहाय कौशल्य चाचणी :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडुंना ज्यांचे वय 19 वर्षातील दि. 1 जानेवारी, 2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आहे. अशा खेळाडुंना संबधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश (50 टक्के प्रवेश ) निश्चित केला जाणार आहे.
अनिवासी प्रवेश प्रक्रिया – अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडुंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. तसेच इतर खेळाडुंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेवून त्या आधारे खेळाडुंना प्रवेश देण्यात येणार आहे. अनिवासी खेळाडू संख्या एका प्रबोधिनीत 25 अशी राहील.
राज्यात क्रीडा प्रबोधिनीमध्ये विविध खेळाच्या प्रवेश प्रक्रिया होणार असून, चाचण्यासाठी विभागस्तरावरुन राज्यस्तरावर असा कृती कार्यक्रम असणार आहे. अमरावती आर्चरी व ज्युदो, नागपुर– हॅण्डबॉल, व ॲथलॅटिक्स, अकोला – बॉक्सिंग, गडचिरोली – ॲथलॅटिक्स, ठाणे – बॅडमिटन, नाशिक– शुटिंग व ॲथलॅटिक्स, कोल्हापुर– शुटिंग व कुस्ती, औरंगाबाद -ॲथलॅटिक्स व हॉकी, पुणे – टेबल टेनिस, वेटलिफिंटग व जिमनॅस्टिक्स इत्यादी खेळनिहाय प्रवेश मर्यादा विचारात घेवून प्रवेश देण्यात येणार आहे. सदर चाचण्याची कृती कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
1. जिल्हास्तरावर – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय – जळगाव येथे विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज भरुन देण्याचा कालावधी – 9 ते 11 मे, 2022 पर्यंत
2. विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन – जिल्हास्तरावर संकलित केलेल्या अर्जानुसार कालावधी 19 ते 20 मे, 2022 करण्यात येणार आहे.
3. राज्यस्तरीय चाचण्याचे आयोजन – 30 ते 31 मे, 2022 कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे होईल.
4. सदर चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खेळाडुंनी विहित नमुन्यातील अर्ज, जन्मदिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्रे, आधारकार्ड व जन्मदाखला) इ. माहिती विहित अर्जासह कालावधीत सादर करावी. अधिक माहितीसाठी श्री. मिनल थोरात राज्य क्रीडा मार्गदर्शक – 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.