जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । भाेपाळ येथील रहिवासी व तेथील नामांकित कृषी कंपनीत अधिकारी असलेले अनुराग शर्मा (वय ३९) हे शुक्रवारी (दि.२९) रेल्वेने बऱ्हाणपूरला येत होते. मात्र, झोप लागल्याने त्यांना रावेरच्या पुढे जाग आली. यावेळी अचानक छातीत दुखत असल्याने भुसावळात उतरून ते स्थानकाबाहेर आले. एका रिक्षा चालकाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली. त्याने शर्मा यांना डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात नेल्यावर पुढील उपचार होऊन शर्मा यांना जीवदान मिळाले.
शर्मा यांना मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल करताच काही मिनिटांत त्यांचे हृदय बंद पडले. यामुळे तत्काळ सहा डीसी शाॅक देण्यात आले. त्यात सुदैवाने हृदयक्रिया सुरू होताच कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला. ही प्रक्रिया रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. यानंतर मात्र शर्मा यांची प्रकृती स्थिर झाली. तत्पूर्वी, शर्मा यांच्या मोबाइलवरून झालेल्या शेवटच्या कॉलवर संपर्क साधला गेला. तेथून कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक घेऊन व्हिडिओ कॉल द्वारे शर्मा यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली. दरम्यान, शर्मा यांच्यावर उपचार सुरू असतानाच मध्य प्रदेशच्या आराेग्य विभागाचे आयुक्त डाॅ. सुदाम खाडे यांनी भाेपाळ येथून डाॅ. मानवतकर यांच्याशी संपर्क केला. शर्मा यांचा जीव वाचवल्याबद्दल आभार मानले. यानंतर त्यांनी शर्मा यांना दवाखान्यात पोहोचवणाऱ्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. त्याचा ते लवकरच छोटेखानी सत्कार करणार आहेत.