जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । शहरात पुन्हा एकदा गँगवार सुरू झाले की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. महाबळ परिसरात असलेल्या झाकीर हुसेन कॉलनीत एका घरावर बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दगडफेक करून शिवीगाळ करण्यात आली आहे. दरम्यान, घरावर गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती तायडे कुटुंबियांनी दिली आहे.
जळगाव शहरातील महाबळ परिसरात जाकीर हुसेन कॉलनीत नलिनी विलास तायडे या कुटुंबासह राहतात. बुधवारी पहाटे २.४५ च्या सुमारास त्यांच्या घराच्या बाहेर काही तरुण आले आणि त्यांनी शिवीगाळ करीत दगडफेक करण्यास सुरुवात केली. जमावाने घराबाहेर उभ्या असलेल्या एका विना क्रमांकाची दुचाकी आणि एक दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएच.००४१ च्या काचा देखील फोडल्या. नलिनी तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते तरुण त्यांची मुले विनोद आणि सतीश तायडे यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु दोन्ही मुले लग्नाला बाहेरगावी गेले होते.
नलिनी तायडे यांनी याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आबा आणि अश्विन नामक व्यक्तीच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. घराबाहेर फटाक्यांसारखा आवाज येत होता आणि घराच्या जिन्यावर दोन छिद्रे पडलेली असल्याने कदाचित गोळीबार झाला असावा असा अंदाज तायडे यांनी व्यक्त केला आहे. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याचे समजते.
सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट दिली असून परिसरात चौकशी केली असता गोळीबार झाला नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच फिर्यादी यांनी देखील निश्चितपणे गोळीबार झाला असल्याचे सांगितले नाही. अद्याप याप्रकरणी चौकशी सुरु असून काहीही ठोस माहिती हाती लागल्यास कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.