जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । हनुमान जन्मोत्सव व बालाजी रथोत्सवानिमित्ताने केशरीनंदन बहुद्देशीय संस्थेने शुक्रवारी सायंकाळी शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराजवळील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात जिल्ह्यातील स्थानिक मल्लांसह मध्य प्रदेशातील पहिलवान देखील सहभागी झाले होते.
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, जि.प.माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगरसेवक प्रा.मुकेश येवले, अभिमन्यू चौधरी यांचे हस्ते झाले. यावलसह कन्नड, बऱ्हाणपूर, रावेर, रसलपूर, वरणगाव, भुसावळ, धरणगाव, जामनेर, खंडवा, जळगाव येथील मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात येथील मुका पहिलवानाने रसलपूर येथील रफिक पहिलवान याला, तर दुसऱ्यांदा बऱ्हाणपूरच्या विशाल पहिलवानास आसमान दाखवले. कन्नडचे शकील पहिलवान व जळगावचे विकी पहिलवान यांच्या कुस्तीत शकील पहिलवान यांनी विजय मिळवला. अंजाळे येथील मुन्ना पहिलवान, वरणगावचे मुतल्लीक पहिलवान या दोघांची १५ मिनिटे चाललेली कुस्ती अनिर्णीत ठरली. गौरव पैलवान व अनुराग पहिलवान यांनीही प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पंच म्हणून गोविंद वस्ताद, भास्कर वस्ताद, अंजाळे येथील पंढरी वस्ताद, यशवंत वस्ताद व संतोष वस्ताद यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पंकज पाटील, राजू बारी, अतुल नाईक, भरत कोळी, गणेश येवले, दाऊद पहिलवान, दीपक पहिलवान, जयदीप पहिलवान, सागर पहिलवान, भावड्या पहिलवान, गोलू महाजन आदींनी परिश्रम घेतले. यावल पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.