जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । लेखन, वाचन, चिंतनाने माणूस मोठा होत असतो. त्यामुळे जीवनात वाचन महत्वाचे आहे वाचाल तर वाचाल. शिक्षणामुळे माणूस घडतो, असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, कवी श्रीकांत देशमुख यांनी केले.
चाळीसगाव येथील एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातर्फे आयोजित आणि डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, सीताबाई मांगीलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृति करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा, कै.गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृति करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि नारायणदास अग्रवाल गौरवार्थ करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धांचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बाेलत हाेते. हे या स्पर्धेचे ३६ वे वर्ष आहे.
याप्रसंगी त्यांनी विचार मांडताना सांगितले की, खान्देशबद्दल मला फार प्रेम आहे. कारण खान्देशने असंख्य कवी महाराष्ट्राला दिले. तसेच जगप्रसिद्ध चित्रकार केकी मुस यांनी चाळीसगावचे नाव जगभर पोहोचवले असेही ते म्हणाले.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल होते. त्यांनी या स्पर्धांच्या आयोजनाचा हेतू बोलून दाखवला. स्पर्धांमधून खूप चांगले वक्ते या महाराष्ट्रात तयार झाले. त्यामुळे आम्ही अशा विविध स्पर्धा आयोजित करतो. त्यासाठी मदत करायला सदैव तयार आहोत. या स्पर्धा १०० वर्षे पूर्ण करोत, अशा शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कथाकार प्रा.राम कदम, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सिनिअर काॅलेज कमिटीचे चेअरमन डॉ.एम.बी. पाटील, संचालक डॉ.सुनील राजपूत, स्त्रीरोग तज्ञ व संचालक डॉ. शुभांगी पूर्णपात्रे, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वादविवाद मंडळ प्रमुख डॉ.वि.रा. राठोड यांनी केले.
स्पर्धेचे प्रायोजक डॉ.पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तसेच चा.ए.सो.चे संचालक डॉ.सत्यजित पूर्णपात्रे यांनी सांगितले की, या स्पर्धांमधून समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्न आणि समस्यांवर चिंतन, मंथन घडून यावे, समाजाला त्याचा फायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.