क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तालुक्यात उत्साहात साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२। जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत आज दिनांक ११/४/२०२२ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ तथा पोलीस पाटील समाधान पाटील, सदस्य शिवाजी डोंगरे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील, शिक्षक देवाजी पाटील, जयंत शेळके, श्रीमती छाया पारधे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता साळुंखे या विद्यार्थिनीने केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, श्रीमती जयश्री पाटील, ज्योती उंबरकर, रामेश्वर आहेर यांनी परिश्रम घेतले.