जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । साखर तयार करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो, त्यामुळे ती मनुष्यासाठी घातक आहे. त्याउलट गुळ आरोग्यवर्धक असल्याने जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी जामनेरसह पहूर येथील शाळांमध्ये तब्बल १० टन गुळाचे वाटप केले.
पित्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू होणे ही प्रचंड दुख:दायी बाब. मात्र, संसाराचा रहाटगाडा चालवायचा असेल तर त्यातून सावरलेच पाहिजे, हा नियतीचा नियम आहे. अशाच प्रसंगातून सावरत जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी नातवाच्या नावे विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्य हाती घेतले आहे. त्यापैकीच गुळ वाटप हा एक उपक्रम नुकताच त्यांनी राबवला. साखर मनुष्यासाठी घातक आहे, याची प्रचिती आल्यानंतर स्वत:च्या शेतातील नैसर्गीक पद्धतीने उत्पादन केलेल्या उसापासून व नैसर्गीक पद्धतीनेच बनवलेल्या तब्बल दहा टन गुळाचे त्यांनी पहूर, जामनेर येथील जिल्हा परिषद शाळा, जामनेर येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलसह अन्य शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रत्येकी दोन किलो याप्रमाणे वाटप केले. लॉर्ड गणेशा स्कूलमध्ये गुळ वाटप करताना संस्थेचे सचिव अभय बोहरा, बाळू डांगी, सुमित जोशी, प्रफुल्ल लोढा उपस्थित होते. दरम्यान, वर्षभर प्रफुल्ल लाेढा हे नानाविध उपक्रम राबवत असतात.