जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । अट्रावल येथील रहिवासी ३५ वर्षीय तरुणाचा पुणे येथील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडून १५ कामगार जखमी झाले होते. पैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून शनिवारी उपचारादरम्यान अट्रावलच्या तरुणाचा मृत्यू झाला.
यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी पंकज ऊर्फ गजानन बाबुराव सोनवणे (वय ३५) हा तरुण गेल्या काही वर्षांपासून पुणे येथे गोमती मेटल पावडर प्रा.लि. या लोखंडाच्या कंपनीत कामाला होता. तेथे १ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एक दुर्घटना घडली. त्यात १५ कामगार जखमी झाले. पैकी सहा जण गंभीर जखमी होते. या सर्वांवर पुणे येथील उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पंकज उर्फ गजानन यांचा मृत्यू झाला. पुणे येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी अट्रावल गावी आणण्यात येईल.