⁠ 
बुधवार, मे 1, 2024

तरुणाने नैराश्यात उचलेले टोकाचे पाऊल; मन्यारखेडा तलावात आढळला मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। आठवडाभरापासून नोकरीच्या शोधात जळगावी बहिणीकडे आलेल्या बुलढाणा येथील २२ वर्षीय तरूणाचा मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय २२, रा. धामणगाव, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव असून, त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा कयास लावला जात आहे.

गेल्या काही वर्षांत नैराश्‍यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून, असे प्रकार तरुणांमध्ये जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अंकुश सुरळकर हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता.

तो मिळेल त्या नोकरीच्या शोधात होता. गुरूवारी (ता. १७) सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, काहीच माहिती मिळाली नाही.

शनिवारी (ता. १९) सकाळी साडेसातच्या सुमारास मन्यारखेडा तलावात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. नशिराबाद पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

सुरवातीला नशिराबाद पोलिस ठाण्यात अनोळखी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील यांच्याकडे आहे. त्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मृताची ओळख पटविल्यावर मृतदेह अंकुश सुरळकरचा असल्याचे निष्पन्न झाले. या वेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अंकुशच्या मागे आई कामिनी, वडील शिवाजी दशरथ सुरळकर, मोठा भाऊ निलेश आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. अंकुशच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, त्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा कयास लावला जात आहे.