⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

धक्कादायक : १२ वीच्या मुलाने युट्युबला पाहून तयार केला बॉम्ब, विम्याच्या लोभापायी कुरिअर शिपमेंटला लावली आग

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । आजच्या सोशल मिडीयाच्या जगात युट्युबला पाहून कोण काय करेल याचा काही नेम नाही. युट्युबला शिक्षण घेत कुणी उंच भरारी घेतली तर कुणी गुन्हेगारीकडे वळले, अशी अनेक उदाहरणे आहेत. जोगेश्वरीतील एका बारावीच्या विद्यार्थ्याने युट्युबला पाहून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. यूट्यूबच्या माध्यमातूनच विमा कंपनीकडून लाभ कसा मिळवावा याची माहिती घेतली. सर्व जुगाड झाल्यावर त्याने प्रत्यक्षात एक सर्किट तयार केले आणि पार्सल करून कुरिअरला पाठविले. कुरिअर गोडावूनला शिपमेंट ठिकाणी आग लागल्यावर सर्वच गोंधळले. पोलीस ठाण्यात प्रकरण पोहचल्यावर सर्व घटनाक्रम उलगडला आणि सर्वच अवाक झाले.

नुकतेच बारावीची परीक्षा दिलेल्या या विद्यार्थ्याला चार लाखांचा कॉम्युटर खरेदी करायचा होता. पैशांचा जुगाड करण्यासाठी त्याने फावल्या वेळेत युट्युबचा आसरा घेतला. युट्युबला पाहून त्याने बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. बॉम्ब तर झाला पुढे विमा कसा मिळवायचा याची माहिती घेतली. दोन कॉम्प्युटर प्रोसेसर खरेदी केल्याचं भासवलं. त्याचं एक बनावट बिलही तयार केलं आणि एका विमा कंपनीची पॉलिसी खरेदी केली. एखाद्या शिपमेंटला आग लागली किंवा नुकसान झालं, तर इलेक्ट्रीक सामानाची मूळ किंमत आणि दहा टक्के नुकसानभरपाई विमा कंपनी आपल्याला देते अशी माहिती विद्यार्थ्याला युट्युबवर मिळाली होती.

विमा कंपनीकडून लाभ कसा मिळवावा हे ठरल्यावर विद्यार्थ्याने घरात कुणीही नसताना युट्युबला पाहून एक इलेक्ट्रीक सर्किट तयार केलं आणि ते पार्सल करण्यासाठी एका बोगस पत्त्यावर पाठवलं. जोगेश्वरीत हे पार्सल एक कुरीअर कंपनीत देण्यात आलं. त्यावेळी कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये पार्सल वेगळं करताना अचानक आग लागली. या आगीची माहित मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी चौकशी केली. पोलिसांच्या तपासात एका पार्सलमध्ये फाटके आणि इलेक्ट्रीक सर्किट आढळून आले. बॉम्ब असल्याचे वाटल्याने प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी सर्व सूत्रे फिरवली. पोलीस कामाला लागले आणि कुरिअर कंपनीतूनच तपासाला सुरुवात करण्यात आली.

हे पार्सल नेमकं कुठून आलं, कुणी दिलं, याची चौकशी करण्यात आली असता पोलिसांना बऱ्यापैकी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचं पथक सांताक्रूझला पोहोचलं आणि त्यांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने युट्युबवर व्हिडीओ पाहून हा प्रताप केल्याचं उघड झालं. या मुलानं नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती. त्यानंतर तो नीट परीक्षेलाही बसणार होता. चार लाखाचा पीसी घेण्यासाठी आणि लाख रुपयांच्या मोबाईलसाठी पैशांचा जुगाड करता यावा म्हणून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले. आता पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची रवानगी डोंगरीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.