जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बोरसे येथील शेतकऱ्याला महाराष्ट्र कृषी विभागाच्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पॉवर टिलर अनुदान मंजूर झाले होते. अनुदान देण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच घेताना तालुका कृषी सहाय्यकाला गुरुवारी अटक करण्यात आली. ललीतकुमार विठ्ठल देवरे, वय-३२ असे सहाय्यकाचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील भोजे येथील शेतकऱ्याने आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची “राज्य कृषी यांत्रिकीकरण” (MAHDBT) योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर 8HP हे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजूर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर 8HP हे मशीन खरेदी केले असता या योजनेअंतर्गत मिळणारी ८५ हजार सबसिडीची रक्कम अर्जदाराचे बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तालुका कृषी सहाय्यक ललीतकुमार विठ्ठल देवरे यांनी पंचासमक्ष १५०० रुपयांची मागणी केली होती.

शेतकऱ्याने लाचबाबत जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. शुक्रवारी विभागाने सापळा रचल्यानंतर लाचेची रक्कम स्वतः तालुका कृषी अधिकारी याने पाचोरा कार्यालयात स्वीकारली. पथकाने ललीतकुमार विठ्ठल देवरे याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकात यांचा होता समावेश
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पी.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.







