जळगाव जिल्हाजळगाव शहर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांच्या आंदोलनाला प्रारंभ!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । विविध प्रकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे मिळाले पाहिजे अशा विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक १४ मार्चपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. ३ मार्च रोजी गुरुवारी त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावात आंदोलनाला प्रारंभ केला.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कॅन्डल मार्च काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

त्यानंतर सोमवारी ७ मार्च रोजी थाळीनाद आंदोलनासह १४ मार्चपर्यंत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, अधिष्ठाता यांना घेराव असे विविध प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे.

सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी १४ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन विविध प्रकारचे आंदोलन करीत आहे.

याबाबत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, सचिव डॉ. योगिता बावस्कर यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Back to top button