जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । गेल्या दोन महिन्यापासून उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी होती. थंडी काहीशी कमी झाल्यानंतर पुन्हा सकाळच्या तापमानात वाढ झाली होती. मात्र गेल्या चार दिवसापासून पुन्हा थंडी वाढू लागली असल्याने त्याचा परिमाण देशभर होत आहे. देशातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पाऊसाची शक्यता आहे. दरम्यान, जळगावात देखील ढगाळ वातावरण असले तरी पाऊसाची शक्यता नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील २४ तासांत ते उत्तर तामिळनाडू किनार्याकडे सरकेल. उपसागरातील या दाबामुळे देशभर ढगाळ वातावरणाची निर्मिती होत असून विशेषतः उत्तरेकडील राज्यात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीत तर पुढील दोन दिवस पाऊस सांगण्यात आला आहे. दिल्लीत आजचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ७ अंश सेल्सिअस राहील. तसेच आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर भारतातील वातावरणामुळे जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच आकाशात ढग पाहायला मिळाले. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पारा किमान १८ अंशपर्यंत तर कमाल ३६ अंश पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सोमवारपासून ढगाळ वातावरण कायम असले तरी तापमानाचा पारा देखील २-३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा आहे.