जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । शाळेतील शिक्षिकेकडून विचित्र वागणूक व वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा प्रकार बोदवड येथील जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेत समोर आला आहे. या प्रकरणी शाळेतील ८ शिक्षकांच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
सविस्तर असे की, बोदवड येथील जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेतील उपशिक्षिका अन्सारी रोशनआरा शमसुद्दीन यांची विचित्र वागणूक, वारंवार धमक्या देणे या प्रकारांना कंटाळून ४ जानेवारीला शिक्षक मोहंमद ईसाक अहमद यांनी बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात शिक्षिका रोशनआरा यांनी ४ जानेवारीला दुपारी ३ वाजता शाळेत तांत्रिक मांत्रिका सारखे प्रकार करून भीतीदायक वातावरण निर्माण केले. याबाबत इतर शिक्षकांनी विचारणा केल्यावर शिवीगाळ केली. तक्रार केल्यास विनयभंगाची केस करेल. जीवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी शिक्षेविरूद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ नुसार गुन्हा नोंद झाला. बोदवड येथील जि.प.उर्दू मुलांच्या शाळेत सन २०१८ पासून अन्सारी रोषणआरा शमसुद्दीन ह्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेत विचित्र वागणूक देतात, अशी तक्रार आहे.
शाळेच्या आवारात अगरबत्ती, तावीज, रेतीचा वापर करून तांत्रिक प्रयोग करणे, विद्यार्थ्यांसमोर बसून विचित्र भाषेत बडबड करून त्यांना घाबरवणे असे प्रकार करतात. याबाबत हटकल्यास सर्व शिक्षकांना शिवीगाळ करणे, आत्महत्येची व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. शालेय प्रशासनाने वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर तोंडी व लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, ४ जानेवारीला दुपारी शिक्षिकेच्या विचित्र प्रकाराला कंटाळून सर्व ८ शिक्षकांनी बोदवड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
वरिष्ठांना अहवाल देणार
संबंधित उपशिक्षिकेविरूद्ध तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी शाळेत पाठवले होते. मात्र, शिक्षिकेने त्यांच्यावरील आरोपांबाबत कोणताही खुलासा दिला नाही. तसा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहोत. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल. असे येथील गटशिक्षण अधिकारी भास्कर लहासे यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना