जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । भावाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना गुजराल पेट्रोलपंप परिसरातील देवरामनगरात शनिवारी ही घटना उघडकीस आली आहे.
देवराम नगरात राहणाऱ्या वैशाली भिकन मराठे (वय ५२) यांच्या तळवेल (वरणगाव) येथे राहणाऱ्या भावाचे दि.२६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. यामुळे त्या तळवेल येथे गेल्या होत्या. मधल्या काळात त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आला.
वैशाली मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अनिल फेगडे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.