जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । शहरात हाणामाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले असून बुधवारी मध्यरात्री जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीत एका चारचाकीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलिसात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. घटनास्थळी हवेत फायरिंग केल्याची देखील चर्चा असून पोलिसांनी त्यास नकार दिला आहे.
जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला हॉटेल मोराकोच्या समोरील दिशेस रात्री १.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली. जळगाव आणि भुसावळ येथील दोन गटात हि हाणामारी झाली असून एका चारचाकीची तोडफोड करण्यात आली आहे. दोन्ही गट वाळू व्यवसायाशी संबंधित असून भांडणाचे नेमके कारण समजून आले नाही.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता फक्त तोडफोड करण्यात आलेली चारचाकी मिळून आली. पोलिसांनी चारचाकी शहर पोलीस ठाण्यात जमा केली असून चारचाकीचा क्रमांक एमएच.१५.बीएस,१९१९ असा आहे. दरम्यान, घटनास्थळी हवेत गोळीबार करण्यात आल्याची देखील चर्चा असून शहर पोलिसांनी त्याचे खंडन केले आहे. रात्री आम्ही घटनास्थळी धाव घेतली असता केवळ चारचाकी मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.