चाळीसगाव तालुक्यातील ग्रंथालयांना पाच लाखांची पुस्तके उपलब्ध
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील २४ शासनमान्य ग्रंथालयांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपयांची स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. अंत्योदय जनसेवा कार्यालयात यांच्या हस्ते या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात असंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात पुस्तकाची किंमत ही त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली स्वप्ने पूर्ण करता यावी, यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून व स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील २४ शासन मान्यता असलेल्या ग्रंथालयांना ५ लाख रुपयांची स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
जीवनात पुस्तकांचे स्थान महत्वाचे
आपल्या जीवनात पुस्तकांचे स्थान खूप महत्वाचे आहे. पुस्तके वाचलीच पाहिजे. कारण पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते. आणि ज्याचे मस्तक सुधारले, तो उभ्या आयुष्यात कोणापुढे नतमस्तक होत नाही, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केले. आपल्या निधीचा सुयोग्य उपयोग करत नवीन पिढीला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे ‘ग्रंथ हेचि गुरू’ हे शिर्षक असलेली व ग्रंथालय, वाचनालय यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी शुभेच्छापत्र सर्व वाचनालयांना भेट देण्यात आली. अंत्योदय जनसेवा कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.