⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

चाळीसगावात निघाली विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली!

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. आपला देश जगात प्रथम क्रमांकावर मार्गक्रमण करीत आहे. हा अमृत काळ आपण सर्व अनुभवत आहोत. आज जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक ,क्रांतिकारक ,स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “हर घर तिरंगा” अभियान राबविले जात असून आज चाळीसगांव शहरात देखील विद्यार्थ्यांतर्फे “घरोघरी तिरंगा” अभियान राबविण्यात आले.

चाळीसगाव शहरातील तिरंगा रॅलीत आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल, आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल, डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय, राष्ट्रीय मुलांचे माध्यमिक विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय मुलींचे माध्यमिक विद्यालय, जयहिंद माध्यमिक विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा,स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, अग्लो उर्दू हायस्कूल, तहजीब उर्दू हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, गुडशेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल,भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, नालंदा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे ५००० विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडे मोफत देण्यात आल्याने या रॅलीने शहराचे वातावरण तिरंगामय झाले होते. रॅलीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची चित्रे प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली होती. खासदार उन्मेष पाटील व त्यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती या रॅलीमध्ये होती.