जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । सीआरपीएफ जवानाला, वाहन चालकासह दोन अज्ञातांनी चाकूच्या धाकावर मारहाण करून लुटले. तसेच रोख रकमेसह मोबाईल हिसकावून संशयित पसार झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
याबाबत असे की, तेलंगणमध्ये कार्यरत सीआरपीएफ जवान श्रीकांत शांताराम माळी (रा.सावित्रीनगर, पारोळा) हे सुटीवर घरी येत होते. १८ रोजी रात्री ते रेल्वेने जळगावात आले. त्यानंतर जळगावातील आकाशवाणी चौफुलीवर ते पारोळ्याला जाण्यासाठी थांबले. तेथून तवेरा वाहनाने ते मध्यरात्री पारोळ्याला जाण्यासाठी निघाले होते. एरंडोल शहराच्या पुढे आल्यावर दादाश्री पेट्रोल पंपावर डिझेल भरून वाहन पारोळ्याकडे निघाले. त्यानंतर रात्री १ वाजून १५ मिनिटांनी भालगाव फाटा येथे संशयितांनी तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. चालकासह दोन अज्ञात संशयितांनी माळी यांना मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून साडेतीन हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाइल व बॅग हिसकावून घेतली. बॅगेत त्यांचा युनिफॉर्म, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. लुटीनंतर संशयित पारोळ्याकडे पसार झाले.
यापूर्वीदेखील या मार्गावर रात्री लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रात्री-अपरात्री महत्वाच्या कामाशिवाय एकट्याने बाहेर पडू नये. गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी. अनोळखी वाहनधारकाची मदत घेणे टाळावे. गरजेच्या वेळी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेनंतर जवान माळी यांनी काही अंतर पायी चालून हाॅटेल गुरूकृपा गाठले व घटना सांगितली. हॉटेलवरूनच जवानाने भाऊ विनोद कोळी यांना घटना कळवली व बोलावून घेतले. त्यानंतर शुक्रवारी (दि.१९) त्यांनी एरंडोल पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे तपास करत आहेत.