जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या व पाचोरा शहरातील अवैध वाळू साठा करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या व मनमानी कारभार करणाऱ्या पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांचेवर निलंबनाची कारवाई करणेबाबत एकलव्य संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली आमरण उपोषणाला उपोषण सुरू केले आहे.
एकलव्य संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, परधाडे हद्दीतील गिरणा नदी पात्रातील संबंधीत ठेकेदार विनापरवानगी अवैध वाळू दररोज २०० ते ४०० ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याबाबत आपल्याला लेखी निवेदन दिलेले आहे. तसेच ९ मार्च रोजी मौजे ग्रा.पं. परधाडे यांनीदेखील लेखी तक्रार दिलेली आहे. तसेच १ मार्च रोजी ग्रा.पं. सरपंच व सदस्यांनी आपल्याशी मोबाईलवरुन संपर्क साधुन आमच्या हद्दीतुन वाळू उचलली जात असलेबाबत तक्रार केल्यामुळे आपण आपले तलाठी व सर्कल यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले होते. परंतू तलाठी, सर्कल यांनी पंचनामा करुन गेल्यावर देखील संबंधीत ठेकेदाराने परधाडे हद्दीतुन वाळू उपसा बंद केलेला नाही. म्हणून एकलव्य संघटनेने दि.१२ मार्च रोजी आंदोलनाचा इशारा
दिल्यावर १२ मार्च रोजी तहसिलदार यांनी परधाडे येथे गिरणा नदीतुन परधाडे हद्दीतील वाळू उपसा होत आहे. म्हणून संबंधीत अधिकारी तलाठी व सर्कल यांना हद्द मोजण्यासाठी पाठविले होते. संबंधीत अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची मोजमाप न करता संबंधीत ठेकेदाराच्या पोकल्यांड ने गिरणा नदी पात्रातील एरंडोल तहसिलदारांनी उत्राण हद्दीतील वाळू गटाच्या हद्दीत लाल झेंडे गाडण्यात आलेले होते. ते झेंडे संबंधीत ठेकेदारांनी काढुन परधाडे हद्दीत वाळू उपसा सुरु केला होता. परंतू एरंडोल तहसिलदारांनी ठेकेदाराला आखुन दिलेल्या लाल झेंड्याच्याही पुढे परधाडे हद्दीत पोकल्यांडच्या सहाय्याने गिरणा नदीच्या सेंटरला चारी पाडून दिली. परंतू ठेकेदाराने उपसा केलेल्या वाळूची कोणत्याही प्रकारची हद्दीची व वाळूची बांधकाम विभागाच्या साहाय्याने मोजणी न करता ठेकेदाराच्या बाजुने निर्णय दिल्याबद्दल पाचोरा
तहसिलदार हे संबंधीत ठेकेदाराशी लागेबांधे आहे. असे दिसुन येते. मौजे उत्राण व मौजे परधाडे गिरणा नदीतील सर्व वाळू पाचोरा शहरात रोज शेकडो वाहने जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयाकडून प्रमाणीत करण्यात आलेल्या वाळू वाहतुक परवान्यावर पावतीवर महामायनींग प्रणालीव्दारे प्राप्त झालेल्या इनव्हाईस नंबर, दिनांक, वेळ नोंदवलेली नसते तरीसुध्दा त्या वाहनांवर कार्यवाही करतांना तहसिलदार दिसत नाही. त्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुकीस आळा घालून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.यासाठी एकलव्य संघटनेतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, १ मार्च रोजी सर्कल, तलाठी यांनी गिरणा नदीत जाऊन परधाडे हद्दीत चुकीचा व खोटा अहवाल आपल्याकडे सादर केल्यामुळे संबंधीत तलाठी व सर्कल यांचेवर
निलंबनाची कारवाई करण्यात यावी. पाचोरा शहरात सुरु असलेल्या शासकीय व खाजगी ठेकेदारांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्या सर्व बांधकामांवर आजरोजी शहरात ठिकठिकाणी ४० हजार ते ५० हजार ब्रास वाळूचे थप्पे दिसत आहेत. आपण तहसिलदार या नात्याने संबंधीत शासकीय व खाजगी ठेकेदार बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी स्वामीत्व शुल्क न भरलेबाबत आतापर्यंत अवैध गौणखनिज साठा करणेबाबत किती दंडात्मक व फौजदारी कारवाई केल्यात. याची माहिती लेखी स्वरुपात मिळावी. व संबंधीत वाळू साठा करणाऱ्यांवर का कारवाई करण्यात आली नाही, म्हणून त्याची सर्वस्वी जबाबदारी अवैध गौणखनिज आळा न घालण्याबाबत पथक प्रमुख म्हणून तहसिलदार, सर्कल व तलाठी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. या मागणी साठी उपविभागीय कार्यालया समोर एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचे मार्गदर्शनाखाली रमेश ठाकरे, कैलास भिल आमरण उपोषणाला बसले आहेत.