शेतजमीन नसलेल्यांचा पी.एम. किसान योजनेत समावेश; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ऑक्टोबर 30, 2021 5:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । ज्यांच्या नावावर एक गुंठाही शेतजमीन नाही, अशांचा पंतप्रधान किसान सन्मान योजनेत समावेश करून त्यांना अवैधरित्या लाभ मिळवून दिल्याचा प्रकार पारोळा तालुक्यात उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी ६ दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud

पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असतात. ज्याच्या नावावर शेतजमीन आहे, असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. मात्र ज्यांच्या नावावर एक गुंठाही शेतजमीन नाही, अशा १८ बोगस लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. पारोळा तालुक्यातील चोरवड येथील १८ लोकांना दलालांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन व तहसीलदारांचे लॉगीन आयडी, पासवर्ड अनधिकृतपणे वापरून दलालांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला, यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे.

सहा जणांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी तहसील कार्यालयाचे कर्मचारी नइमोद्दीन नसिरोद्दीन मुजावर यांच्या फिर्यादीवरून राहुल जगन्नाथ पाटील (चोरवड), प्रशांत उत्तम हटकर (कमतवाडी), महेश ज्ञानेश्वर खैरनार (मंगरूळ), देविदास जगन्नाथ जाधव (मंगरूळ), संजय धर्मा बाविस्कर (मोंढाळे प्र.उ), सचिन विठ्ठल पाटील उर्फ बाबाजी (शिरसमनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील सावळा गोंधळ व प्रशासनाचा निष्क्रियपणा यानिमित्ताने समोर आली आहे.

महिनाभरात दुसरी घटना
लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन व तहसीलदारांचे लॉगीन आयडी, पासवर्ड याचा अनधिकृतपणे वापरून योजनेचा लाभ मिळवून देण्याची महिनाभरात ही दुसरी घटना आहे. पीएम किसान योजनेची नोंदणी बंद असतांना देखील पीएम किसानच्या संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचा प्रकार यावल येथे घडला होता. याप्रकरणी किनगाव येथील एका सेतू सुविधा केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतांना पारोळा तालुक्यात पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now