⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आझाद नगर दंगल : २९ संशयितांविरुद्ध गुन्हा, ६ जणांना अटक

आझाद नगर दंगल : २९ संशयितांविरुद्ध गुन्हा, ६ जणांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । शहरातील खंडेरावनगर भागात असलेल्या आझाद नगरात मुलीची छेड काढल्याच्या वादातून शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी होऊन दगडफेक झाली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दंगलीचा रात्री उशीरा २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

खंडेराव नगरातील आझाद नगरात दर शनिवारी बाजार भरतो. २ आठवड्यांपूर्वी बाजारात आलेल्या एका मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. शनिवारी पुन्हा तसाच काहीसा प्रकार पुन्हा घडला. त्या रागातून मुलीच्या कुटुंबातील काही लोक व त्यांच्या साथीदारांनी शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एकाला मारहाण केली होती. या मुलीच्या गटातील एकाने आझाद नगरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे हे पथकासह पोहचले. जमाव ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आणि दोन घरांचेही नुकसान झाले. रात्री पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह आरसीपी, शीघ्र कृती दलाच्या कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. पहाटेपर्यंत पोलिसांनी आरोपींची धरपकड केली. संशयितांनी शासकीय कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली होती.

पोलीस हवालदार संजय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित दानिश पिंजारी, अशपाक खान, रमजान पिंजारी, रेहान शेख, समीर शेख सलीम, अज्जू चावल, अक्तर फरीक , मोहमंद पिंजारी, अक्तर पिंजारी, समितर पटवे, संजय धनगर, सागर भोई, सनी उर्फ खंडू उमप, राकेश भोई, विक्की भोई, विक्की भोई, नाना भोई, यशवंत भोई, बारकू भोई, समाधान भोई, मुश्ताक पिंजारी, इम्रान पिंजारी, गंभीर पिंजारी, अनिल पिंजारी, शाहीद पिंजारी, शाहरूख पिंजारी, आवेश पिंजारी, लखन भोई , बारकू उर्फ राम भोई आणि सादीक मुनाफ या २९ जणांवर रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मारहाण झालेल्या बारकू भोई ( रा.खंडेराव नगर ) यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणारे दानिश पिंजारी, समीर सलीम, रेहान शेख (रा.पिंप्राळा), अज्जू चावला ( खंडेराव नगर ), रमजान पिंजारी , अश्फाक खान (खंडेराव नगर) आणि अन्य ५ अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील ६  संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा अद्याप शोध सुरु आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.