टाकळी प्र.चा. गावाला मिळणार कायमस्वरूपी शुध्द व नियमित पाणी

सप्टेंबर 24, 2021 11:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारायाने टाकळी प्रचा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेतली. चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या सोलर एनर्जीवर आधारित १६ कोटींच्या पाणीपुरवठा योजना व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे महिन्याभरात टेंडर काढण्याचे आश्वासन किशोरराजे निंबाळकर यांनी दिले.

New Project 2 3

चाळीसगाव शहराला लागून असलेल्या टाकळी प्र.चा.गावाच्या पाणीटंचाई वर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. आमदार मंगेश चव्हाण यांनी टाकळी प्रचा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या भावना किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे मांडल्या असता जलशुद्धीकरण प्रकल्प व इतर वाढीव बाबींसह सुमारे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर येत्या महिन्याभरात काढण्यात येणार असल्याचे आश्वासन किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह टाकळी प्र.चा येथील सरपंच पती सतीश महाजन सर, ग्रा.पं. सदस्य संदिप स्वार, अण्णा गवळी, भावेश कोठावदे, प्रल्हाद महाजन सर, विजय पाटील सर, चंद्रकांत महाजन, आबा महाजन, विजय गुजर, युवराज गुजर, भूषण महाजन, बाबूराव जाधव हे उपस्थित होते.

गावाच्या पाणीप्रश्नासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकजूट दाखवल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले तसेच येणाऱ्या काळात सदर योजना पूर्ण होऊन टाकळी प्रचा गावाची पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारे टाकळी प्रचा हे गाव चाळीसगाव शहराच्या लगत पसरलेले असून गावात जवळपास २५ हजार लोकवस्ती आहे. सदर गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने गावात नोकरदार, उद्योजक, छोटे मोठे व्यावसायिक यांची प्रामुख्याने वसाहत आहे. सद्यस्थितीत गावात कार्यरत असणारी गिरणा नदीवरील जुनी पाणीपुरवठा योजना ही अपूर्ण पडत असल्याने ८ दिवसाआड टाकळी प्रचा गावात पाणीपुरवठा होतो.

त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. काही महिन्यांपूर्वी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांनी टाकळी प्रचा गावासाठी 16 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्याला मंजुरी देऊन त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तत्कालीन सचिवांना दिले होते. त्यांनंतर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे किशोर राजे निंबाळकर यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिव पदी नियुक्ती झाली अन या योजनेच्या कामाला गती मिळाली.

अशी आहेत १६ कोटींच्या पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण योजनेची वैशिष्ट्य –

सदर योजनेंतर्गत टाकळी प्रचा गावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार असून टाकळी प्रचा वासीयांना प्रक्रिया केलेलं शुद्ध पाणी उपलब्ध होईल. यासोबतच नवीन अत्याधुनिक प्रणालीची पाईपलाईन, वाढीव जलकुंभ व प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. यामुळे गावातील प्रत्येक प्रभागाला सारख्या दाबाने पाणीपुरवठा होऊन पाणीटंचाई कायमस्वरूपीची मिटणार आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या वतीने होणारे लोडशेडिंग, तांत्रिक कारणांमुळे अनेकदा पाणीपुरवठा करण्यास व्यत्यय येतो यासाठी सदर योजनेत सोलर प्लांट चा देखील समावेश करण्यात आला असून वीज व सोलर एनर्जी यावर कार्यरत असणारी ही चाळीसगाव तालुक्यातील पहिली पाणीपुरवठा योजना असणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now