जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । काही दिवसांपुर्वी चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठेदाराने बचत गटाचे अनुदान परस्पर लाटले असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याच पार्श्वभुमीवर बचत गटाचे अध्यक्ष व सदस्या यांनी सखोल चौकशी केली असता याच बचत गटाच्या नावाने धुळ्याच्या बँकेत त्या पुरवठादाराने बनावट खाते उघडले असल्याचे उघडकीस आले असुन त्या बोगस ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी बचत गटाच्या अध्यक्षा यांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, लता सुभाष अग्रवाल या चाळीसगाव येथील रहिवाशी असून त्या चाळीसगावच्या जय माता दी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची अध्यक्षा व माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या सदस्या आहेत. त्यांनी दिनांक 01/07/2021 आणि 06/07/2021 सदर बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठादाराने एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) भुसावळ या विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचा आधार घेत बचत गटातील सदस्यांच्या खोट्या सह्या करून परस्पर अनुदान लाटल्या संदर्भात अनेक वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्धीसाठी दिले होते.
त्या वृत्ताची दखल घेत अनेक वृत्तपत्रांनी वृत्त प्रसिद्धीस देखील दिले होते. याबाबत बचत गटाच्या अध्यक्षांनी सखोल चौकशी केली असता धुळे येथील त्या बोगस पुरवठेदारांनी वरील दोन्ही बचत गटाच्या नावाने धुळे येथील बँक ऑफ इंडिया, शाखा धुळे येथे दिनांक 31/8/2008 रोजी खाते क्रमांक 069010110000379 जय मातादी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षांच्या खोट्या सह्या करून धुळे येथील 1) उर्मिला ओमप्रकाश गिंदोडीया (रा. रामामृत : रागरंग कॉलनी, पोलिस चौकीजवळ, अग्रवाल नगर, धुळे), 2) मेघा ओमप्रकाश गिंदोडीया (रा. रामामृत : रागरंग कॉलनी, पोलिस चौकीजवळ, अग्रवाल नगर, धुळे, ह.मु. सेंधवा मध्यप्रदेश) व माता माधवी स्वयं सहाय्यता महिला बचत गट यांच्या सदस्याच्या नावाने 1) कुसुम अनिल गिंदोडीया (रा. रामामृत : रागरंग कॉलनी, पोलिस चौकीजवळ, अग्रवाल नगर, धुळे), 2) सोनल ओमप्रकाश गिंदोडीया (रा. रामामृत : रागरंग कॉलनी, पोलिस चौकीजवळ, अग्रवाल नगर, धुळे), 3) गंगादेवी जगदिशप्रसाद गिंदोडीया (मयत) यांनी खाते क्रमांक 069010110000378 हे खोट्या सह्या करून उघडले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्या पुरवठादाराने चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने पोषण आहाराची कामे घेऊन गावातील बचत गटाला लाभापासून वंचित ठेवत बँकेच्या खात्यात परस्पर रक्कम वर्ग केली आहे. वास्तविक बघता धुळे येथे चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने खाते उघडलेच कसे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बचत गटाच्या नावाने खाते उघडताना त्या फॉर्मवर बचत गटातील अध्यक्षा सचिव यांच्या सह्या व बचत गटाचे शिक्के असतात तरीही अध्यक्षांचे कुठेही सह्या व पुर्वपरवानगी न घेता परस्पर खाते उघडले गेले.
याबाबत धुळे येथील बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर यांनी शहानिशा करणे गरजेचे होते. ही शहानिशा त्यांनी का केली नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सदरील पोषण आहाराच्या कामकाजा संदर्भात एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कुठलीही शहानिशा न करता संबंधितांना परवानगी दिली कशी ही अधिकारी कर्मचारी वेळोवेळी कुणाच्या संपर्कात होते याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. वरील सर्व कारणांचा व परिस्थितीची चौकशी होऊन धुळे येथील बोगस पुरवठादार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी (नागरी) भुसावळ, जि.जळगांव यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच बँकेतील मॅनेजर व संबंधित कर्मचारी यांची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून या महिला बचत गटांना न्याय मिळेल.
एकंदरीतच या सर्व कटकारस्थानाला गिंदोडीया कुटूंबातील पुरूष 1) ओमप्रकाश रामदेव गिंदोडीया, 2) अनिल रामदेव गिंदोडीया, 3) अभिषेक ओमप्रकाश गिंदोडीया, 4) पंकज अनिल गिंदोडीया यांनी संगनमताने कोट्यावधी रूपयांना शासनाला गंडा घातला आहे.शिवाय ह्या धुळ्यातील गिंदोडीया कुटुंबाने अशी कित्येक ठिकाणी शासनाची व बचत गटांची फसवणूक करून अनुदान लाटले असेल ह्याची सुद्धा चौकशी शासनाने करावी.अशी माहिती बचत गटाच्या अध्यक्षा लता अग्रवाल यांनी पत्रकाद्वारे दिली आहे याबाबत बचत गटाच्या अध्यक्षांकडुन चौकशी सुरूच असुन अजुन इतर माहिती उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.